केंद्रीय मंत्र्यांच्या गाडीला ताफ्यातील गाडीने दिली मागून धडक, डोक्याला दुखापत

मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्री जितिन प्रसाद यांच्या गाडीला आज अपघात झाला, आपल्या मतदारसंघात पूरग्रस्त भागाचा दौरा करत असताना त्यांच्या गाडीला हा अपघात झाला. त्यांच्या गाडीला मागून धडक दिल्याने ते किरकोळ जखमी झाले आहेत.

केंद्रीय मंत्र्यांच्या गाडीला ताफ्यातील गाडीने दिली मागून धडक, डोक्याला दुखापत
| Updated on: Jul 20, 2024 | 6:36 PM

केंद्रीय मंत्री आणि खासदार जितीन प्रसाद यांच्या गाडीला अपघात झाल्याने ते जखमी झाले आहेत. लोकसभा मतदारसंघ पिलीभीत दौऱ्यावर असताना त्यांच्या गाडीला अपघात झाला. मंत्र्यांच्या गाडीच्या ताफ्यातील एका वाहनाला धडक बसली. ज्यामुळे जितिन प्रसाद यांच्यासह त्यांचे खासगी सचिवही जखमी झाले आहेत. वाहन घटनास्थळी सोडून केंद्रीय मंत्री दुसऱ्या वाहनाने कार्यक्रमासाठी रवाना झाले. माढोळा-विजती रोडवर ही  घटना घडली. जितीन प्रसाद यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाल्याची माहिती मिळत आहे. ताफा वेगाने पुढे जास असताना हा अपघात झाला. गाडीला जोरदार धडक बसल्याने गाडीचे ही मोठे नुकसान झाले आहे.

केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद हे त्यांच्या लोकसभा मतदारसंघात एका कार्यक्रमासाठी जात असताना हा अपघात झाला. त्यांच्याच ताफ्यातील एस्कॉर्ट कारने अचानक ब्रेक लावल्याने जितिन प्रसाद यांची गाडीही थांबली मात्र मागून येणाऱ्या कारने त्यांच्या कारला धडक दिली. ज्यामुळे कारचे नुकसान पण झाले आणि गाडीतील लोकांना ही किरकोळ दुखापत झाली आहे. या अपघातानंतर मंत्री कार्यक्रमाच्या ठिकाणी रवाना झाले.

पूरग्रस्त भागाला भेट दिली

जितिन प्रसाद पूरग्रस्त गावे आणि भागांना भेट देत होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष संजीव प्रताप सिंह, आमदार सुधीर गुप्ता आणि आमदार प्रकाश नंद यांची वाहनेही या ताफ्यात होती. अतिवृष्टीनंतर आलेल्या पुराने परिसरातील अनेक गावांना वेढले आहे. त्यामुळे  जनजीवन विस्कळीत झाले आहे. उत्तर प्रदेशमध्ये हवामान बदलणार आहे. उत्तर प्रदेशात 22 ते 24 जुलै हे तीन दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. दिल्ली आणि पंजाबसह अनेक राज्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.