
28 फेब्रुवारी रोजी इस्त्रायलने इराणवर हल्ला केला आणि मध्य पूर्वेत भीषण युद्धाला सुरुवात झाली. इस्त्रायलने इराणवर हल्ला करताच अमेरिकेनं देखील या युद्धात उडी घेतली. गेल्या 14 दिवसांपासून हे युद्ध सुरू आहे. या युद्धात इराणचं मोठं नुकसान झालं आहे. मात्र इराणने देखील इस्त्रालय आणि अमेरिकेवर मिसाईल हल्ले सुरूच ठेवले आहेत. या हल्ल्यांमध्ये अमेरिका आणि इस्त्रायलचं प्रचंड नुकसान झालं आहे. इराणकडून आखाती देशात असलेल्या अमेरिकेच्या सैन्य तळांवर हल्ले करण्यात आले. हे हल्ले खूपच अचूक होते. या हल्ल्यांमध्ये अमेरिकेचे अनेक सौनिक मारले गेले. इराणच्या या अचूक हल्ल्यांमागे रशिया आणि चीनचा हात असल्याचा आरोप आता अमेरिकेकडून करण्यात आला आहे. रशियाने इराणला सैन्य तळांची अचूक माहिती पुरवली त्यामुळेच हे हल्ले झाले असा आरोप अमेरिकेनं केला आहे.
अल जजीराच्या एका रिपोर्टनुसार अमेरिकेच्या तीन उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी द वॉशिंग्टन पोस्टला बोलताना चीन आणि रशियावर आरोप केले आहेत. रशियाकडून इराणला पश्चिम आशियामध्ये तैनात असलेल्या अमेरिकन जहाजांची तसेच सैन्य तळांची गुप्त माहिती देण्यात आली. तसेच रशियाकडून इराणला लोकेशन देखील देण्यात आलं, असा आरोप या अधिकाऱ्यांनी केला आहे.
मात्र दुसरीकडे रशियाने आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. एका रिपोर्टनुसार रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या युद्धाच्या पार्श्वभूमीवर फोनवर संवाद साधला. त्यावेळी पुतिन यांनी रशियावर होत असलेले आरोप फेटाळून लावले आहेत. आपण इराणला कोणत्याही प्रकारची मदत केली नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे चीन देखील आता इराणच्या मदतीला धावून आला आहे. इराणमध्ये झालेल्या नुकसानाच्या पार्श्वभूमीवर तब्बल दोन लाख डॉलर इराणला मदत म्हणून देणार असल्याची घोषणा चीनकडून करण्यात आली आहे. तसेच इराणला मानवतेच्या दृष्टीकोनातून आवश्यक ती सर्व रसद पुरवण्यात येईल असं देखील चीनने म्हटलं आहे, अमेरिकेच्या दबावाला न जुमानता आता चीन आणि रशिया हे आपला मित्र असलेल्या इराणच्या मदतीसाठी पुढे येत आहेत.