Yogi Adityanath: आईला अखेरचा निरोप, योगी आदित्यनाथ यांचा अश्रुंचा बांध फुटला, आज होणार अंत्यसंस्कार
Yogi Adityanath: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आईचे शुक्रवारी निधन झाले. भाषणादरम्यानच त्यांना ही वार्ता समजली. आज थोड्या वेळानंतर हरिद्वार येथील चंडीघाटावर पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे.

Yogi Adityanath: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आईचे सावित्री देवी यांचे शुक्रवारी निधन झाले. आज शनिवारी सकाळी ११:३० वाजता त्यांच्या हरिद्वार येथील चंडीघाटावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. या अंत्यविधीला विविध क्षेत्रांतील आणि राजकीय वर्तुळातील नेते उपस्थित असतील. अंत्यसंस्कार झाल्यानंतर मुख्यमंत्री योगी आजच लखनऊकडे रवाना होतील. संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थितीत होणार्या कार्यक्रमात ते सहभागी होतील.
दुपारी लखनऊला रवाना
सूत्रांच्या माहितीनुसार, चंडीघाटावर अंत्यसंस्कार आणि पुढील विधी पूर्ण झाल्यावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ लखनऊसाठी दुपारी रवाना होतील. आज संध्याकाळी ५:३० ते ६:४५ या कालावधीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत कौशल दीक्षांत कार्यक्रमात ते सहभागी होतील.
काल भाषण सुरू असताना आईच्या निधनाची वार्ता
सावित्री देवी यांचे शुक्रवारी सकाळी १०:४५ वाजता उत्तराखंडमधील पौडी गढवाल जिल्ह्यातील पंचूर गाव येथील मूळ निवसस्थानी वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले. काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूरमधील चंपा देवी पार्क येथे आयोजित एका सार्वजनिक कार्यक्रमात भाषण देत असतानाच त्यांना आईच्या निधनाची वार्ता कळवण्यात आली. ५० हजारांहून अधिक लाभार्थ्यांना टॅबलेच वाटपाच्या कार्यक्रमासाठी ते उपस्थित होते. भाजप खासदार रवी किशन यांनी निधन वार्ता माजी आयएएस अधिकारी अविनाश अवस्थी यांना कळवली. ६१ मिनिटांचे भाषण पूर्ण केल्यावर मुख्यमंत्री मंचामागे गेले. तिथे अवस्थी यांनी त्यांना ही माहिती दिली.
आईला श्रद्धांजली
आईच्या निधनाची वार्ता समजल्यावर मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावरील भाव बदलले. त्यांनी स्वतःला सावरले. त्यांनी तरुण लाभार्थ्यांसोबत फोटो काढले. त्यांच्याशी संवाद साधला आणि ते ताडीने आपल्या मूळ गावी रवाना झाले. त्यांनी आईच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. श्रद्धांजली वाहिली. यावेळी आदित्यनाथ यांना अश्रू अनावर झाले. गोरखनाथ मंदिर कुटुंब आणि महाराणा प्रताप शिक्षण परिषद यांच्या वतीनं मंदिरात शोकसभा घेण्यात आली. यावेळी दोन मिनिटं मौन पाळून सावित्री देवी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.