पश्चिम बंगाल धुमसलं, वक्फ कायद्याला विरोध करण्यासाठी लोक रस्त्यावर, हिंसेत तिघांचा मृत्यू

या सर्व घडामोडी घडत असताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वक्फ कायद्याविषयी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पश्चिम बंगालमध्ये हा कायदा लागू होणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलंय.

पश्चिम बंगाल धुमसलं, वक्फ कायद्याला विरोध करण्यासाठी लोक रस्त्यावर, हिंसेत तिघांचा मृत्यू
west bengal violence
| Updated on: Apr 12, 2025 | 9:41 PM

West Bengal Violence : विधेयकाचे आता कायद्यात रुपांतर झाले आहे. पश्चिम बंगालमध्ये मात्र या कायद्याला कडाडून विरोध केला जात आहे. येथे ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. राज्यातील मिर्शिदाबाद येथील शमशेरगंज या भागात काढण्यात आलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले यात एकूण तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

शुक्रवारीदेखील मुर्शिदाबाद येथे वक्फ कायद्याविरोधात काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागले होते. या प्रकरणी आतापर्यंत पश्चिम बंगालमध्ये एकूण 118 लोकांना अटक करण्यात आले आहे.

वक्फ कायद्याला विरोध करण्यासाठी रस्त्यावर

मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी दुपारी समशेरगंज येथील जाफराबाद या भागात लोक वफ्क कायद्याला विरोध करण्यासाठी एकत्र जमले होते. मात्र यादरम्यान, मोर्चाला हिंसक वळण लागले. त्यादरम्यानच एका गावावर हल्ला करण्यात आला. यात एकाच कुटुंबातील पिता-पुत्राची हत्या करण्यात आली.

पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक

शुक्रवारीही मुर्शिदाबाद येथे लोक मोठ्या संख्येने रस्त्यावर जमले होते. या लोकांकडून वक्फ कायद्याला विरोध करण्यात आला होता. आंदोलनकर्ते वक्फ कायद्याविरोधात घोषणाबाजी करत होते. आंदोलनादरम्यान समशेरगंज याच परिसरात असणाऱ्या धुलियम भागातील राष्ट्रीय महामार्ग-12 अडवून धरला. मोर्चाला हिंसक वळण लागल्यानंतर पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली. काही वाहनांची जाळपोळही करण्यात आली होती. यात एकूण 10 पोलीस अधिकारी जखमी झाले होते.

शनिवारी हीच हिंसा धुलियान या भागापर्यंत वाढली. या भागात एका व्यक्तीला गोळी लागल्याची माहिती मिळते आहे. स्थितीवर नियंत्रण मिळवता यावे म्हणून पोलीस लाठीमार, अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न करत आहेत.

ममता बॅनर्जी नेमकं काय म्हणाल्या?

दरम्यान, या सर्व घडामोडी घडत असताना पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वक्फ कायद्याविषयी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पश्चिम बंगालमध्ये हा कायदा लागू होणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलंय. “ज्या कायद्यामुळे लोकांत नाराजी आहे, तो कायदा आम्ही बनवलेला नाही. हा केंद्र सरकारने तयार केलेला कायदा आहे. मी याआधीच स्पष्ट केलेलं आहे की, पश्चिम बंगालमध्ये या कायद्याची अंमलबजावणी होणार नाही. मग हा हिंसाचार कशासाठी केला जातोय,” असं ममता बॅनर्जींनी म्हटलंय.

ममता बॅनर्जी यांच्या या भूमिकेनंतर भाजपाने त्यांच्यावर टीका केली आहे. आम्ही सत्तेत आल्यास अशा प्रकारच्या गुंडगिरीली आणि हिंसाचाराला आम्ही पाच मिनिटांत मिटवू, असे पश्चिम बंगालचे भाजपा अद्यक्ष सुकांत मुजुमदार म्हणाले आहेत.