ममता बॅनर्जींना बंडखोरांचा आणखी एक दणका, आता थेट कार्यालयावर कब्जा; बंगालमध्ये काय घडतंय?

West Bengal Politics : तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर आमदारांनी कोलकात्यातील पक्षाच्या मुख्यालयावर ताबा मिळवत पक्षावरील आपला दावा अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला.

ममता बॅनर्जींना बंडखोरांचा आणखी एक दणका, आता थेट कार्यालयावर कब्जा; बंगालमध्ये काय घडतंय?
Trinamool Congress Mamata Banerjee
Image Credit source: Google
| Updated on: Jul 03, 2026 | 10:42 PM

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसची सत्ता गेल्यापासून माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मोठे धक्के बसले आहे. काही दिवसांपूर्वी पक्षात दोन गट पडल्यानंतर आता बंडखोर आमदारांनी कोलकात्यातील पक्षाच्या मुख्यालयावर ताबा मिळवत तृणमूल काँग्रेसवरील आपला दावा अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न केला. विधानसभेतील विरोधी पक्षनेते ऋतब्रत बॅनर्जी आणि त्यांच्या समर्थकांनी पक्ष मुख्यालयात बैठक घेतली. यावेळी त्यांनी कार्यालयाचे कुलूपही बदलले आणि बाहेर लावलेले कटआउट्स हटवून नवीन कटआउट्स लावले. त्यामुळे देशातील जनतेला बंगालमध्ये नेमकं काय सुरू आहे असा प्रश्न पडला आहे.

टीएमसीचे पक्ष कार्यालय बंडखोरांच्या ताब्यात

ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसपासून वेगळे होत स्थापन केलेली तृणमूल काँग्रेस आता त्यांच्या हातातून निसटत चालली आहे. पक्षाचे मुख्यालय कोलकात्यातील ईएम बायपास परिसरात आहे. मात्र, तेथे बांधकाम सुरू असल्यामुळे 2022 पासून पक्षाचे कामकाज मेट्रोपॉलिटन कार्यालयातून सुरू होते. सध्या पक्षातील नेते याच कार्यालयातून काम करतात. मात्र, शुक्रवारी ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर आमदारांनी या मुख्यालयावर ताबा मिळवला असून पक्षावरील दावा आणखी बळकट केला आहे.

खरी तृणमूल काँग्रेस आमचीच, बंडखोर नेत्यांचा दावा

आज विरोधी पक्षनेते ऋतब्रत बॅनर्जी यांच्यासोबत फिरहाद हकीम, जावेद खान, संदीपन साहा आणि अखरुज्जमान उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपणच खरी तृणमूल काँग्रेस असल्याचा दावा केला. ऋतब्रत बॅनर्जी यांनी म्हटले की, ‘या इमारतीच्या मालकांसोबत आवश्यक करार पूर्ण झाले असून, आता येथूनच पक्षाचे कामकाज चालवले जाईल आणि हेच तृणमूल काँग्रेसचे अधिकृत मुख्यालय असेल. पक्षाचे नेते अखरुज्जमान यांनीही सांगितले, ‘आम्हीच खरी तृणमूल काँग्रेस आहोत आणि हे कार्यालयही तृणमूल काँग्रेसचेच आहे. या कार्यालयाशी पक्षाच्या भावना जोडलेल्या आहेत.’

ममता बॅनर्जी यांच्या नेत्यांकडून टीका

बंडखोर आमदारांनी मुख्यालयावर ताबा मिळवल्यानंतर ममता बॅनर्जी यांच्या समर्थकांनी या घटनेचा निषेध केला. पक्षातून बडतर्फ करण्यात आलेल्या नेत्यांना मुख्यालयात येण्याचा कोणताही अधिकार नाही आणि त्यांनी अशा प्रकारचे कृत्य करू नये असं या समर्थकांनी म्हटले आहे.

 

Follow Us