
आपली मराठी भाषा ही अति प्राचिन आणि समृद्ध अशी भाषा आहे, भाषांचा अभ्यास केल्यास असं जणावतं की अनेक भाषांना त्यांच्या काही मर्यादा आहेत. म्हणजे एका शब्दाला दुसरा पर्यायी शब्द लवकर सापडत नाही, मात्र मराठी भाषेचं तसं नाहीये, असं म्हणतात मराठी भाषेत प्रत्येक बारा कोसावर तुम्हाला मुळ शब्दासाठी पर्यायी शब्द सापडतो. तुम्ही जेव्हा महाराष्ट्रात फिरता तेव्हा तुम्हाला असं जाणवतं की प्रत्येक विभागामध्ये मराठीचं आपलं एक वेगळेपण आहे. कोकणात आल्यानंतर कोकणी, खानदेशामध्ये गेल्यानंतर अहिराणी, मराठावाड्यामध्ये आल्यानंतर मराठी भाषेच्या काही शब्दांमध्ये आणखी बदल होतो. पुणे, मुंबईसारख्या शहरात शुद्ध मराठी असे अनेक प्रकार तुम्हाला पाहिला मिळतात, म्हणूनच मराठी इतकी दुसरी कुठलीच भाषा इतकी समृद्ध नाही असं मानलं जातं.
मात्र इंग्रज भारतात आल्यानंतर मुळ मराठी भाषेमध्ये मोठ्याप्रमाणात सरमिसळ झाल्याचं पहायला मिळतं, म्हणजे असे अनेक इंग्रजी शब्द आहेत, जे आपण जसेच्या तसे मराठीमध्ये घेतले आहेत. उदहारण द्यायचं झालं तर टेबल, बँक, चेक असे अनेक शब्द आहेत, ज्यांना मराठीमध्ये काय म्हणतात हेच आपण विसरून गेलो आहोत.
चेकला मराठीमध्ये धनादेश असं म्हणतात, समजा तुम्ही एखाद्या बँकेत गेलात आणि म्हटलं की मला धनादेश वठवायचा आहे, तर त्या बँकेतील कर्मचाऱ्याचा देखील काही काळ गोंधळ उडेल कारण धनादेश हा शब्द तेवढासा आता बोलला जात नाही, मात्र त्याऐवजी चेक या शब्दाचा उपयोग केला तर ते त्या बँक कर्मचाऱ्याच्या लगेच लक्षात येईल. तो तुमची मदत करेल.
तसंच रिमोटचं देखील आहे, रिमोट ही तुमच्या दैनंदिन जीवनात आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात खूप गरजेची वस्तू बनली आहे. आज टीव्हीपासून ते फॅनपर्यंत आणि इलेक्ट्रिक मोटरीपासून ते गाडीपर्यंत सर्व वस्तू तुम्ही एका क्लिकवर नियंत्रित करू शकता, मात्र गंमत बघा रिमोट हा शब्द मराठी भाषेत एवढा प्रचलित झाला आहे, की त्याला मराठीमध्ये काय म्हणतात हे अनेकांना सांगता येणार नाही. रिमोट या शब्दाला मराठीमध्ये दूर नियंत्रणक असं म्हटलं जातं. दूरच्या वस्तू नियंत्रण करणारी यंत्रणा म्हणून दूर नियंत्रणक असा हा शब्द तयार झाला आहे.