
भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला आणि अॅक्सिओम-४ मोहिमेतील इतर क्रू मेंबर्स आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) आता शेवटचे काही दिवस थांबणार आहेत. या शेवटच्या दिवसांचा ते सर्वजण पुरेपूर फायदा घेत आहेत. त्यांच्याकडून अवकाश संशोधनाचे भविष्य घडवू शकणारे प्रयोग केले जात आहेत. ते सोमवारी पृथ्वीवर परत येण्याची शक्यता आहे.
ड्रॅगन अंतराळयान २६ जून रोजी चार अंतराळवीरांच्या क्रूसह आयएसएसवर पोहोचले होते. या मिशनचे नेतृत्व करणाऱ्या अॅक्सिओम स्पेसकडून एक्सवर माहिती देण्यात आली आहे. त्यात म्हटले की, सोमवारी १४ जुलै रोजी सकाळी भारतीय वेळेनुसार ४.३५ मिनिटांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापासून वेगळे होणार आहे.
शुभांशू शुक्ला आणि इतर तीन अंतराळवीर अनडॉकिंगच्या सुमारे दोन तास आधी अंतराळयानात चढण्याची शक्यता आहे. अंतराळ सूट घालून पृथ्वीवर परतण्याचा प्रवास सुरू करण्यापूर्वी त्यांच्या काही आवश्यक चाचण्या होणार आहेत. आयएसएस २८ हजार किमी वेगाने पृथ्वीची परिक्रमा करत आहे. अंतराळ यान हळूहळू वेगात येण्यासाठी स्वत: अनडॉकिंग प्रक्रिया सुरु करणार आहे. त्यानंतर ते पृथ्वीच्या वातावरणात पुन्हा प्रवेश करून एका नियुक्त ठिकाणी उतरणार आहे.
अॅक्सिओम स्पेसने एका निवेदनात म्हटले आहे की, शुभांशू शुक्ला यांनी शैवाळच्या प्रयोगांवर काम केले. ते अंतराळ मोहिमांसाठी अन्न, ऑक्सिजन आणि जैवइंधन प्रदान करू शकतील. सूक्ष्म शैवाळची लवचिकता त्यांना पृथ्वीच्या पलीकडे जीवन टिकवून ठेवण्यासाठी एक आशादायक माध्यम बनवते.
अमेरिकन अंतराळ संस्था नासाने एका वक्तव्यात म्हटले की, गुरुवारी एक्सपिडिशन ७३ आणि अॅक्सिओम मिशन ४ (एक्स-४) च्या क्रू वेळापत्रकात संशोधन आणि स्पेससूट देखभालीला प्राधान्य देण्यात आले. तसेच एक प्रयोग मेंदूच्या रक्तप्रवाहावर केंद्रीत आहे. सूक्ष्म गुरुत्वाकर्षण आणि कार्बन डाइऑक्साइडचा ह्रदयावर काय परिणाम होतो? त्याच्यावरही संशोधन केले जात आहे.