Trisha Krishnan: थलपती विजय यांना टोमणा मारण्याच्या नादात पुन्हा त्रिशाबद्दल टिप्पणी; नेत्याच्या वक्तव्यावरून वाद

तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांना टोमणा मारण्याच्या नादात AIADMK च्या नेत्याने अभिनेत्री त्रिशा कृष्णनवर टिप्पणी केली आहे. यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. याआधी उदयनिधी स्टॅलिन यांनीसुद्धा त्रिशाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

Trisha Krishnan: थलपती विजय यांना टोमणा मारण्याच्या नादात पुन्हा त्रिशाबद्दल टिप्पणी; नेत्याच्या वक्तव्यावरून वाद
Thalapathy Vijay and Trisha Krishnan
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 12, 2026 | 11:07 AM

सध्या देशभरात तमिळनाडूचं राजकारण विशेष चर्चेत आलं आहे. यामागचं कारण म्हणजे तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय आणि अभिनेत्र त्रिशा कृष्णन यांच्यातील मैत्री. या दोघांमधील नातं सतत काही ना काही कारणामुळे चर्चेत येतं. अशातच विरोधकसुद्धा थलपती विजय यांच्यावर निशाणा साधण्याची एकही संधी सोडत नाहीत. काही दिवसांपूर्वीच तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमके नेते उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर त्रिशाबद्दल दुहेरी अर्थाची अश्लील टिप्पणी केल्याचा आरोप होता. याप्रकरणी त्यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यातसुद्धा घेतलं होतं. त्यानंतर आता AIADMK चे नेते आणि माजी मंत्री आर. बी. उदयकुमार यांनी त्रिशाबद्दल वादग्रस्त टिप्पणी केली आहे. त्यांच्या वक्तव्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

उदयकुमार म्हणाले, “विजय यांच्या त्रिशाची राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी कधी नियुक्ती होईल, याची तमिळनाडू वाट पाहत आहे.” यावेळी त्यांनी असाही आरोप केला की, टीव्हीके सरकार विजय यांच्या जवळच्या लोकांना महत्त्वाच्या पदावर नियुक्त करत आहे. यात त्यांच्या चित्रपटांशी जोडलेले निर्माते आणि टेक्निकल क्रूमधल्या लोकांचाही समावेश आहे. उदयकुमार यांनी मंदिर विश्वस्त, नवी दिल्लीतील तमिळनाडू सरकारचे विशेष प्रतिनिधी, विजय यांचे खाजगी सचिव, राज्य चित्रपट प्रशिक्षण संस्थेचे प्रमुख आणि सरकारी सल्लागार यांसारख्या पदांसह अनेक नियुक्त्यांचा उल्लेख केला.

उदयकुमार यांच्या वक्तव्यानंतर त्रिशाच्या चाहत्यांनी मदुराईमध्ये आंदोलन केलं. त्रिशा फॅन्स वेलफेअर असोसिएशनच्या सदस्यांनी शहराच्या अनेक भागांमध्ये निषेधाचे फलक लावले. त्रिशाचे चाहते अशी वक्तव्ये सहन करणार नाहीत आणि गरज पडल्यास संपूर्ण तमिळनाडूमध्ये आंदोलन करतील, असं या फलकांवर लिहिलं होतं. टीव्हीकेच्या एका अधिकाऱ्यानेही उदयकुमार यांच्यावर त्रिशाबद्दल केलेल्या अपमानजनक वक्तव्याबद्दल कारवाई करण्याची मागणी केली आहे. इतकंच नव्हे तर त्यांनी तुतीकोरीन जिल्हा पोलिसांकडे याविरोधात तक्रारसुद्धा दाखल केली आहे.

याआधी उदयनिधी स्टॅलिन यांनी कावेरी पाणीप्रश्नांशी संबंधित आंदोलनात त्रिशाबद्दल अश्लील टिप्पणी केली होती. सभेला संबोधित करताना स्टॅलिन यांनी थलपती विजय यांच्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला होता. कावेरी पाणी प्रश्नाबद्दल उदयनिधी म्हणाले होते, “आमचे मुख्यमंत्री कावेरी पाणी प्रश्नावर तोंड उघडत नाहीत. त्यांना आमच्या पक्षावर खोटे खटले दाखल करण्याची जास्त चिंता आहे.” यावेळी गर्दीतून काही जणांना “त्रिशा, त्रिशा..” अशी घोषणाबाजी सुरू केली. तेव्हा उदयनिधी क्षणभर थांबले, हसले आणि मग म्हणाले, “पाणी इतरत्र पोहोचो किंवा न पोहोचो, तिथे मात्र पोहोचायला हवं. मला कावेरी म्हणायचं होतं.” हे ऐकताच लोकांनी जोरजोरात हसत टाळ्या वाजवल्या होत्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us