कोण आहेत के कविता? ज्यांनी महिला आरक्षणाचा लढा दिल्लीत लावून धरलाय? मोदी सरकारची नवी डोकेदुखी?

| Updated on: Mar 11, 2023 | 3:35 PM

K Kavita | तेलंगणाच्या नेत्या के कविता सध्या चर्चेत आहेत. महिला दिनानंतर त्यांनी महिला आरक्षणाच्या मंजुरीसाठी मोदी सरकारविरोधात आंदोलन केलं. तर ईडीच्या कारवाईवरूनही त्या पुन्हा चर्चेत आहेत.

कोण आहेत के कविता? ज्यांनी महिला आरक्षणाचा लढा दिल्लीत लावून धरलाय? मोदी सरकारची नवी डोकेदुखी?
Image Credit source: social media
Follow us on

नवी दिल्ली : एकिकडे महाराष्ट्रात कोल्हापुरातील राष्ट्रवादीचे बडे नेते हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्याविरोधात पहाटेच ईडीच्या (ED) अधिकाऱ्यांनी कारवाई सुरु केली आहे. तर दुसरीकडे दिल्लीतील कथित मद्यविक्री घोटाळ्यात के कविता यांचं नाव चर्चेत आलंय. ईडीचे अधिकारी त्यांचीही चौकशी करत आहेत. के कविता या तेलंगणातील बीआरएस पक्षाच्या नेत्या आहे. तर तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेकर राव यांच्या कन्या आहेत. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी ज्या लोकांशी व्यवहार केल्याचा आरोप आहे, त्यात के कविता यांचंही नाव आहे. दक्षिणेपासून उत्तरेपर्यंतच्या राजकीय वर्तुळात सध्या के कविता यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. याचं आणखी एक प्रमुख कारण म्हणजे नुकतीच त्यांनी महिला आरक्षण विधेयकाची मागणी अधिक जोरकसपणे लावून धरली आहे. शुक्रवारी त्यांनी या मागणीवरून जंतरमंतरवर उपोषण केलं. देशातील १८ विरोधी पक्षांनी त्यांच्या या मागणीला पाठिंबा दिलाय.

महिला आरक्षणासाठी आग्रह

९ मार्च रोजी कविता यांनी महिला आरक्षण विधेयकाबाबत दिल्लीत केंद्र सरकारच्या भूमिकेचा निषेध केला. भाजपाला पूर्ण बहुमत मिळालं तर महिला आरक्षण विधेयक लागू करू, असं आश्वासन देण्यात आलं होतं. पण २०१४ आणि २०१९ मध्ये बहुमत मिळूनही भाजपने आश्वासन पूर्ण केलं नाही. आता तरी महिला आरक्षण विधेयकाला मंजूरी द्या, अशी मागणी करत के कविता यांनी दिल्लीत उपोषण केलं. त्यांच्या या मागणीला आप, अकाली दल, पीडीपी, तृणमूल काँग्रे, जदयू, राष्ट्रवादी, सीपीआय, आरएलडी आदी पक्षांनी पाठिंबा दिला आहे.

कोण आहेत के कविता?

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या कन्या के कविता या निजामाबाद येथील विधान परिषद सदस्या आहेत. १३ मार्च १९७८ रोजी जन्मलेल्या कविता ४५ वर्षांच्या आहेत. २०१४ मध्ये त्या निजामाबाद येथून खासदार म्हणून विजयी झाल्या. पण २०१९ मध्ये लोकसभा निवडणूकीत पराभूत झाल्या. त्यानंतर त्यांची विधान परिषदेवर वर्णी लागली. बीटेकची पदवी घेतल्यानंतर त्यानी मिसिसिपी विद्यापीठातून मास्टर ऑफ सायंस केलं. अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून नोकरी केली. त्यानंतर व्यावसायिक देवनपल्ली अनिल कुमार यांच्याशी त्यांचा विवाह झाला. लग्नानंतर त्या अमेरिकेत स्थायिक झाल्या होत्या. मात्र २००६ मध्ये पुन्हा वडिलांसोबत त्या राजकारणात सक्रिय झाल्या.