अयोध्येत श्रीरामांची मूर्ती शाळीग्राम दगडापासून बनवण्यास का इतका विरोध? पाहा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट

| Updated on: Feb 04, 2023 | 11:59 PM

अयोध्येत उभ्या राहणाऱ्या राम मंदिरात प्रभू श्रीरामाची मूर्ती शिळाग्राम दगडातून (Shaligram Stone) साकारली जाणाराय. यासाठी खास नेपाळमधून (Nepal) आणलेले शिळाग्राम दगडही दाखल झाले आहेत.

अयोध्येत श्रीरामांची मूर्ती शाळीग्राम दगडापासून बनवण्यास का इतका विरोध? पाहा Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट
Follow us on

लखनऊ : अयोध्येत उभ्या राहणाऱ्या राम मंदिरात प्रभू श्रीरामाची मूर्ती शिळाग्राम दगडातून (Shaligram Stone) साकारली जाणाराय. यासाठी खास नेपाळमधून (Nepal) आणलेले शिळाग्राम दगडही दाखल झाले आहेत. मात्र महंत परमहंस दास (Mahant Paramhans Das) यांनी शिळाग्राम दगडाच्या वापरास विरोध केलाय. तसं झालं तर अन्नत्यागाचाही इशारा दिलाय. शाळीग्राम दगडाने अयोध्येत प्रभू श्रीराम आणि सीतामातेची मूर्ती साकारली जाणार आहे. काही दिवसांपूर्वीच नेपाळमधून आणलेला हा दगड अयोध्येत दाखल झाला. पवित्र मानल्या जाणाऱ्या या दगडासोबत अनेक भारतीयांसोबत नेपाळचे मान्यवरही अयोध्येत पोहोचले. वाटेत अनेक ठिकाणी या दगडाची पूजा झाली. शाळीग्राम दगड हे काही कोटी वर्ष जुने मानले जातात. जाणकारांच्या मते सध्या हे दगड नेपाळमध्ये आढळतात.

अयोध्येतली रामाची मूर्ती शाळीग्राम दगडानं बनवली जाणार हे निश्चित झाल्यानंतर अनेक जण शाळीग्राम दगडाचे नमुने घेऊन आले होते. मात्र तपासणी अंती ते दगड शाळीग्राम नसल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर एक पथक जवळपास महिनाभर शाळीग्राम दगडाच्या शोधात होतं. आणि तो शोध अखेर नेपाळमध्ये जाऊन संपला.

मात्र या दगडात रामांची मूर्ती कोरण्यास महंत परमहंस दासांनी विरोध केलाय. नेपाळहून आणलेल्या या शाळीग्राम दगडावर जर हातोडी चालली, तर अन्न-पाणी त्यागणाचा इशारा त्यांनी दिलाय.

हे सुद्धा वाचा

कारण धारणेनुसार शाळीग्राम दगडात भगवान विष्णुचा वास असतो. म्हणून परमहंस दासांनी शाळीग्राम दगडातून
मूर्ती साकारण्यास विरोध केलाय.

शाळीग्राम दगड महत्वाचा का मानला जातो, त्यामागची कहाणी काय आहे?

धार्मिक कथांमध्ये तुम्ही माता तुलसी आणि भगवान शाळीग्रामचा उल्लेख ऐकला असेल. त्या कथेनुसार जालंधर नावाच्या एका राक्षसानं पार्वतीला जिंकण्यासाठी कैलास पर्वतावर हल्ला केला.

दुसरीकडे जालंधरची पत्नी वृंदानं देवतांपासून आपल्या पतीचं म्हणजे जालंधरचं संरक्षण व्हावं म्हणून तपश्चर्या सुरु केली. वृदांची तप्शचर्या सिद्धीला आली तर जालंधर पराभूत होणार नाही या शक्यतेनं देव घाबरले. म्हणून विष्णु जालंधरचं रुप घेऊन वृंदाच्या समोर गेले. समोर पती आल्याचं पाहून वृंदाची तपश्चर्या भंग झाली.

मात्र जेव्हा विष्णु जालंधरच्या रुपात आल्याचं वृंदाला समजलं, तेव्हा वृंदानं विष्णुला दगड होण्याचा शाप दिला. आणि विष्णुनंही वृंदाला तुळशी होण्याचा प्रतिशाप दिला. पण पुढे वृंदेच्या पतिव्रत्यावर संतुष्ट होऊन विष्णूनं तुळशी नेहमी पूजली जाण्याचं वरदान दिलं.

शिळाग्राम हा दगड फक्त नेपाळमध्येच का आढळतो, या दगडावर सुदर्शन चक्रासारखे दिसणारे चिन्ह कसे काय असतात, त्यालाही धार्मिक कथांचा आधार आहे.

कथेनुसार वृंदा शापातून मुक्त झाल्यानंतर भगवान विष्णुनं तिला वरदान दिलं. त्यानुसार गंडकी नदीद्वारे पृथ्वीवर सदैव प्रवाही राहण्याचा वृंदाला आशीर्वाद मिळाला.

आणि विष्णुचं रुपही सदैव गंडकी नदीच्या जलप्रवाहात शाळीग्राम दगडाच्या स्वरुपात विराजमान झाले. विष्णुनं तेव्हा असंही म्हटलं होतं की नदीतले किटक दातांनी माझ्यावर सुदर्शन चक्र कोरतील. म्हणून माझ्या या दगडाच्या रुपाचीही पृथ्वीवर पूजा होत राहील.

विष्णुच्या या वरदानामुळेच शाळीग्राम दगड प्रामुख्यानं गंडकी नदीतच मिळतो. जी नदी सध्याच्या नेपाळमधून वाहते. त्यामुळे रामाची मूर्ती इतर दगड किंवा सोनं-चांदीनं बनवावी. आणि नेपाळमधून आणलेला शाळीग्राम दगड परत पाठवावा, अशी मागणी महंत परमहंस दासांनी केलीय.

प्रसिद्ध देवस्थानच्या मूर्तींची निर्मिती शाळीग्राम दगडापासून

नेपाळमधून आणलेला शाळीग्राम दगड 7 फुटांचा आहे. अयोध्येत साकारली जाणारी रामाची मूर्ती ही उभ्या मुद्रेत असून साधारण साडे पाच फूट उंचीची असणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे या दगडात मूर्ती सहजपणे साकारली जाणाराय.

शाळीग्राम दगडात मूर्ती कोरण्यास परमहंस दासांनी विरोध केला असला तरी याआधीही अनेक प्रसिद्ध देवस्थानच्या मूर्ती या शाळीग्राम दगडातूनच कोरण्यात आल्या आहेत.

वृंदानवनातल्या राधा-रमण यांची मूर्ती शाळीग्राम दगडातून साकारली गेलीय. त्याशिवाय पद्मनाथ मंदिरातील मूर्ती, बद्रिनाथ मंदिरातली मूर्ती इतकंच नव्हे तर पंढरपुरातली रुक्मिनीची मूर्तीही शाळीग्राम दगडातून बनवल्याचं सांगितलं जातं.

सर्वात महत्वाचं म्हणजे याआधी रामजन्मभूमीवरचं जे जुनं राम मंदिर होतं, त्या मंदिराचे खांब सुद्दा शाळीग्राम दगडातून बनवले गेले आहेत.

शाळीग्राम दगड धार्मिक मान्यतेत पवित्र मानला जातो. मात्र शास्रीयदृष्टयाही दगड महत्वाचा आहे. अतिशय मजबूत असल्यामुळे या दगडावर कारागीर बारीक काम करु शकतात.

कोरीव कामावेळी शाळीग्राम दगडाला कधीच तडा जात नाही. म्हणूनच शाळीग्राम दगड महत्वाचे आहेत. तूर्तास
परमहंस दासांनी याला विरोध केलाय. त्याचं पुढे काय होतं? हे पाहणं महत्वाचं आहे.