निर्भयपणे काम करा, CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवर पेलेट गनचा वापर, वादादरम्यान CRPF प्रमुखांचा जवानांना थेट संदेश

CRPF Chiefs Gyanendra Pratap Sing on Pellet Gun: दिल्लीतील जंतर मंतर आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर पॅलेट गनचा वापर करण्यात आल्यावरून वातावरण तापले आहे. या आरोपांदरम्यान CRPF चे महासंचालक ज्ञानेंद्र प्रताप सिंग यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी जवानांना थेट संदेश दिला आहे. देशहितासाठी घेण्यात आलेल्या निर्णयाची जबाबदारी आपण स्वत:वर घेऊ असे ते म्हणाले.

निर्भयपणे काम करा, CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवर पेलेट गनचा वापर, वादादरम्यान CRPF प्रमुखांचा जवानांना थेट संदेश
सीआरपीएफ, ज्ञानेंद्र प्रताप सिंग
| Updated on: Jul 30, 2026 | 11:59 AM

नीट पेपरफुटीविरोधात दिल्लीतील जंतरमंतरवर कॉक्रोच जनता पार्टीने (सीजेपी) 35 हून अधिक दिवसांचे आंदोलन केले. 20 जुलै रोजी आंदोलक आणि पोलिसांमध्ये धुमश्चक्री उडाली. केंद्रीय राखीव पोलीस दलाने बळाचा वापर केल्याचा आरोप झाला. या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर पॅलेट गनचा वापर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. CRPF चे महासंचालक ज्ञानेंद्र प्रताप सिंग यांनी यावर आता मौन सोडले आहे. त्यांनी जवान आणि अधिकाऱ्यांचे मनोबल वाढवले आहे. एका कार्यक्रमात बोलताना कार्यस्थळी जवानांनी जो निर्णय घेतला, त्याची जबाबदारी आपण स्वतः घेत असल्याचे महासंचालक म्हणाले.

निर्णयाची जबाबदारी माझी

सोमवारी सीआरपीएफच्या इन्व्हेस्टीचर कार्यक्रमाला महासंचालक ज्ञानेंद्र प्रताप सिंह यांनी संबोधित केले. “महासंचालक म्हणून मी तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो की, ऑपरेशन बटालियन असो वा कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम असो, तुम्ही सर्व राष्ट्रहितात, लोकहितासाठी जो काही निर्णय घ्याल, त्या सर्व कारवाईची जबाबदारी माझी असेल.” असे सिंह म्हणाले. तुम्ही निर्भयपणे तुमचे काम करत रहा. जिथे जबाबदारी निश्चित करण्याची गरज पडेल, तेव्हा महासंचालक म्हणून मी जबाबदारी अंगावर घेईल असे त्यांनी स्पष्ट केले.

यापूर्वी इंडिया टुडेच्या एका वृत्तानुसार, सीआरपीएफ मुख्यालयाने सर्व तुकड्यांसाठी एक संदेश पाठवला होता. जवानांनी जे धैर्य आणि संयम दाखवला, त्याचे कार्यालयाने नुकतेच कौतुक केले होते. पण जाणीवपूर्वक केलेली कारवाई अथवा कायद्याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असे सीआरपीएफने स्पष्ट केले आहे.

RAF च्या कारवाईवर सवाल

सीआरपीएफच्या रॅपिड ॲक्शन फोर्स(आरएएफ) सध्या चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे. 20 जुलै रोजी कॉकरोच जनता पार्टीच्या संसदवरील मोर्चादरम्यान जंतर मंतर आणि दिल्लीतील इतर ठिकाणी जी कारवाई झाली, त्यावरून देशभरात संताप उसळला होता. आरएएफ हे सीआरपीएफचे एक खास युनिट आहे. 1992 मध्ये दंगा काबू करण्यासाठी आणि सार्वजनिक अशांततेची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हे पथक स्थापन करण्यात आले होते. 20 जुलै रोजी जंतर मंतर परिसरात सुरक्षा यंत्रणांवर दगडफेक झाली आणि त्यानंतर आंदोलकांवर लाठीहल्ला झाला होता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us