
मध्य प्रदेशातील एका विद्यार्थ्याने मोठ्या हौसेने नवीन मोबाईल नंबर घेतला. पण आता हाच नंबर त्याच्यासाठी डोकेदुखी ठरत आहे. या नंबरवर येणाऱ्या फोनमुळे त्याचं जगणं मुश्किल झालं आहे. त्याचं कारण म्हणजे हा नंबर आधी मध्य प्रदेशातील एका बड्या नेत्याचा आणि विद्यमान मंत्र्याचा होता. मंत्री महोदयाने या नंबरचा वापर बंद केला. त्यामुळे टेलिकॉम कंपनीने हा नंबर या विद्यार्थ्याला दिला. त्यानंतर या विद्यार्थ्याला इतके फोन येऊ लागलेत की विचारता सोय नाही. अनेकजण विविध मागण्या करत आहेत. कुणी आपल्या समस्या सांगत आहेत. तर कुणी फक्त हॅलो, मंत्री महोदय, तुम्ही घरी आहात का? असा सवाल करून भांडावून सोडत आहेत.
भोपाळच्या एका कॉलेजात हा तरुण शिकतोय. त्याने एक मोबाईल खरेदी केला. त्यासोबत नवीन सीमकार्डही त्याने खरेदी केलं. योगायोगाने त्याला जो नंबर मिळाला होत राज्यातील एका ज्येष्ठ मंत्र्याचा होता. राज्यातील असंख्य लोक आणि नोकरशहांकडे मंत्री महोदयांचा हा नंबर होता. त्यामुळे या नंबरवर सातत्याने फोन येत आहे. राज्यातील जनता, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, अधिकारी आणि व्हिआयपी कॉलही या नंबरवरून येत आहेत. त्यामुळे हा नंबर माझा आहे. मंत्री महोदयाचा नाही, असं या विद्यार्थ्याला वारंवार सांगावं लागत आहे.
मंत्र्याचा स्टाफ समजतात
मी नंबर घेतल्यापासून अनेक फोन येत आहे. रात्री अपरात्री केव्हाही फोन येत आहेत. काही लोक सरकारी कामे सांगत आहेत. काही लोक नागरी समस्यांची तक्रार करत आहेत. तर काही लोक वैयक्तिक समस्या मांडत आहेत. तर काही लोक भेटण्यासाठी वेळ मागत आहेत. अनेकजण माझ्या बोलण्यावर विश्वासच ठेवत नाहीये. मंत्र्याचा स्टाफ असल्याचं समजूनच माझ्याशी बोलत असतात, असं या विद्यार्थ्याने सांगितंल.
आधी मजा, नंतर…
सुरुवातीला या विद्यार्थ्याला मोठ्या लोकांशी बोलण्याचं अप्रुप वाटलं. पण नंतर वारंवार फोन येऊ लागल्याने त्याची डोकेदुखी वाढली. तो इतका वैतागला की त्याने फोन रिचार्ज करणंच बंद केलं आहे. त्यामुळे त्याचीही इनकमिंग आणि आऊटगोइंगची सुविधा बंद झाली आहे. दरम्यान, यावर टेलिकॉमच्या अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नंबर रिलोकेशनची प्रक्रिया सामान्य आहे. जुने नंबरच ग्राहकांना दिले जातात. पण अशा परिस्थितीतून मार्ग काढण्याची कोणतीच व्यवस्था नसल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
डीपीवर सूचना
दरम्यान, अनोळखी नंबर येत असल्याने वैतागलेल्या या तरुणाने व्हॉट्सअपवरचा आपला डीपी बदलला आहे. त्यावर हा मंत्र्याचा नंबर नाहीये. कृपया कार्यालयात संपर्क साधून नवीन नंबर घ्यावा, असं त्याने डीपीवर लिहिलं आहे. कॉल्स येऊ नये म्हणून त्याने नंबर रिचार्ज करणंही बंद केलं आहे. तो फक्त वायफायद्वारेच व्हॉट्सअपचा वापर करत आहे.