Yogi Adityanath: हवेच्या गुणवत्तेची कसली चिंता करता? ती आपोआप सुधारेल, दिवाळीतील प्रदूषणावर योगी आदित्यनाथ म्हणाले काय?
Yogi Adityanath on Air Pollution: दिवाळीतील फटक्यांमुळे देशातील अनेक शहर आणि गावातील हवेची गुणवत्ता कमालीची खालावली आहे. त्यातच आग लागण्याच्या घटनांमध्येही मोठी वाढ झाली आहे. त्यावरून आता देशभरात चिंता व्यक्त होत असतानाच नेत्यांनी मात्र वेगळाच सूर आळवला आहे.

Yogi Adityanath on Air Pollution in Diwali Festival: फटाके फोडल्याने रोगराई दूर होते असे अकलेचे तारे भाजपच्या आमदार पापिया अधिकारी यांनी केले होते, तर दुसरीकडे आता दिवाळी हा मानव निर्मित रोग असल्याचे वादग्रस्त वक्तव्य काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांनी केले होते. तर आता त्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भर पडली आहे. दिवाळीतील फटक्यांमुळे देशातील अनेक शहर आणि गावातील हवेची गुणवत्ता कमालीची खालावली आहे. त्यातच आग लागण्याच्या घटनांमध्येही मोठी वाढ झाली आहे. त्यावरून आता देशभरात चिंता व्यक्त होत असतानाच नेत्यांनी मात्र वेगळाच सूर आळवला आहे. लखनऊ येथील एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
सणउत्सवात वायूप्रदूषणाबाबत तक्रारी वाढल्या आहेत. जगातील 100 सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारतातील 93 शहरांचा समावेश असल्याचा अहवाल नुकताच समोर आला. पण त्याची पर्वा कोणत्याच नेत्यालाही नसल्याचे समोर आले आहे. दिवाळीच्या सणात प्रदूषण होते, अशी अनेक लोकांची तक्रार असते. प्रदूषण होते हे मला मान्य आहे. पण ते आपोआप निघूनही जाते. मग त्याची इतकी काळजी का करायची? असा सवाल आदित्यनाथ यांनी विचारला.
हवेच्या गुणवत्तेची कसली चिंता करता? ती आपोआप सुधारेल
हवेच्या गुणवत्तेची कसली चिंता करता? ती आपोआप सुधारेल, असे योगी आदित्यनाथ म्हणाले. फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण हे तात्पुरत्या स्वरूपाचे असते आणि ते कायमस्वरूपी नसते, असे मत त्यांनी मांडले. सामान्य नागरीक वर्षातून एकदा सण साजरा करतात. त्याबद्दल विरोधकांकडून होणारी टीका चूक असल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सूर आळवला.
विरोधकांवर हल्लाबोल
या कार्यक्रमातून मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी विरोधकांवर निशाणा साधला. यापूर्वी 2017 मध्ये उत्तर प्रदेशात सणासुदीत दंगली आणि संचारबंदी लागू असायची. सामान्य नागरिकांच्या उत्साहवर पाणी फिरायचे तर व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान व्हायचे. पण गेल्या काही वर्षात राज्यात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे सुधारली आहे. नागरिक कोणतीही भीती न बाळगता सण उत्साहाने साजरे करत असल्याचे त्यांनी सांगितले.