
सोशल मीडियावर पाकिस्तानच्या समर्थनार्थ आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याबद्दल उत्तर प्रदेशातील मेरठमधील सिव्हिल लाईन्स पोलीस स्टेशन परिसरातील पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. आरोपीचे नाव झैद असून तो ठाणे कोतवाली परिसरातील रहिवासी आहे आणि सिव्हिल लाईन्स परिसरात असलेल्या मयूर नावाच्या सलूनमध्ये काम करतो. ‘पाकिस्तान जिंदाबाद’, ‘पाकिस्तान सही है’ सारख्या प्रक्षोभक घोषणा आणि पाकिस्तानच्या बाजूने टिप्पण्या करणारी एक पोस्ट इन्स्टाग्रामवर करण्यात आली होती. स्थानिक नगरसेवकाला या पोस्टची माहिती मिळाल्यानंतर हे प्रकरण सुरू झालं.
ही पोस्ट झैद नावाच्या तरुणाने इंस्टाग्रामवर केल्याचा दाव स्थानिक नगरसेवकाने केला. आरोपीन पाकिस्तान समर्थनार्थ टिप्पणी केल्यानंतर त्या पोस्टवर पाकिस्तानमधूनही अनेक समर्थनीय प्रतिक्रिया आल्या. या पोस्टबद्दल स्थानिक हिंदू समुदायात तीव्र संताप होता. त्यानंतर नगरसेवकांनी काही स्थानिकांसह सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशन गाठले आणि आरोपींविरुद्ध लेखी तक्रार दाखल केली.
या प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तरुणाला अटक केली. त्या तरुणाच्या सोशल मीडिया अकाउंटवरून केलेल्या आक्षेपार्ह पोस्टची चौकशी केली जात असल्याचे सांगत सीओ सिव्हिल लाइन्स अभिषेक तिवारी यांनी या घटनेची पुष्टी केली. भारताने पाकिस्तानमध्ये केलेल्या कारवाईनंतर, सोशल मीडिया अकाउंटवर सतत लक्ष ठेवले जात आहे. तेथे (सोशल मीडियावर) दिशाभूल करणाऱ्या आणि प्रक्षोभक पोस्ट पोस्ट केल्या गेल्या आहेत, असे ते म्हणाले.
ऑपरेशन सिंदूरनंतर पोलिस आणि सरकार सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सतत लक्ष ठेवून आहे आणि सामान्य लोकांना फक्त अधिकृत स्त्रोतांकडून मिळालेली माहिती शेअर करण्याचे आणि अनावश्यक अफवा आणि आक्षेपार्ह मजकुरापासून अंतर राखण्याचे आवाहन केले जात आहे. या प्रकरणात, पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे आणि तपास सुरू आहे.
पहलगामचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर
22 एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरन व्हॅलीत आलेल्या पर्यटकांना लक्ष्य करून त्यांच्यावर गोळीबार करत दहशतवाद्यांनी 26 जणांचा जीव घेतला. या हल्ल्यामुळे अख्खा देश हादरला. याचा बदला घेण्यासाठी 6-7 मे च्या रात्री भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत कारवाई करत पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळांवर मिसाईल डागत ते उद्ध्वस्त केले. त्यात सुमारे 100 दहशतवादी ठार झाले.