
दिल्लीतील मुंडका परिसरात मेट्रो स्टेशनजवळ असलेल्या तीन मजली व्यावसायिक इमारतीला काल रात्री (शुक्रवारी) भीषण आग लागल्याची घटना घडली. या अपघातात महिलेसह 27 जणांचा मृत्यू झाला, तर 12 जण जखमी झाले आहे. जखमींना ग्रीन कॉरिडॉर बनवून संजय गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. .

आगीच्या घटनेची माहिती मिळताच रात्री उशिरापर्यंत अग्निशमन दलाच्या गाड्या घटना स्थळावर दाखल झाल्या. तब्बल 30 गाड्या आग विझविण्याचे काम करत होत्या. अग्निशमन विभागाचे संचालक अतुल गर्ग म्हणाले की ,रात्री 11 वाजेपर्यंत 26 मृतदेह इमारतीतून बाहेर काढण्यात आले होते, तर एका महिलेचा उडी मारून मृत्यू झाला. अजूनही इमारतीत अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जातआहे, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याचीही शक्यता आहे.

मुंडका परिसरातील इमारतीला आग लागल्याचे समजताच तेथे तातडीने बचावकार्य सुरू झाले. आग विझवून इमारतीत प्रवेश करताच एक-एक मृतदेह तेथे सापडले. बहुतांश मृतदेह दुसऱ्या मजल्यावरून बाहेर काढण्यात आले.

घटनास्थळावर बचाव कार्यात गुंतलेल्या अग्निशमन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार , आग लागलेल्या इमारतीच्या आतील दृश्य खूपच भयावह होते.बहुतेक मृतदेह जळून राख झाले होते. त्यांची ओळख पटवणे शक्य नव्हते. इमारतीतून एक एक करून मृतदेह बाहेर काढल्यानंतर ते संजय गांधी रुग्णालयाच्या शवागारात सुरक्षित ठेवण्यात आले आहेत.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी त्यांचे डीएनए करावे लागणार आहे. दुसरीकडे, आपल्या प्रियजनांच्या शोधात रुग्णालयाबाहेर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार इमारतीतील बहुतांश मृतदेह दुसऱ्या मजल्यावरून सापडले आहेत. रात्री उशिरापर्यंत इमारतीचा शोध घेण्याचे काम सुरू होते

बेपत्ता लोकांची आणि मृतांची संख्या जुळल्यानंतर बेपत्ता लोकांच्या नातेवाईकांचे डीएनए नमुने घेतले जातील, यानंतर या मृतदेहांचा डीएनए नातेवाइकांच्या डीएनएशीही जुळणी केली जाणार आहे.

आगीच्या घटनेनंतर दिल्लीचे मुख्यमंत्रीअरविंद केजरीवाल यांनी घटनास्थळी भेट दिली, तसेच या घटनेबाबता दुःख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांच्या प्रती आपल्या संवेदना व्यक्त केल्या.