श्रीदेवीने नाकारलेला चित्रपट माधुरी दीक्षितने गाजवला, मोडले सर्व रेकॉर्ड, एका गाण्याने दिली नवी ओळख
90 च्या दशकात श्रीदेवीने नाकारलेला चित्रपट माधुरी दीक्षितने गाजवला. चित्रपटातील एका गाण्याने तिला दिलेली प्रचंड मोठी ओळख, आजही तिला त्याच नावाने ओळखतात लोक.

90 च्या दशकात बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं पण त्यापैकी एक गाजलेला चित्रपट म्हणजे 'बेटा'. 34 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. आजही या चित्रपटाचे लाखो चाहते आहेत.

या चित्रपटात माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. ‘बेटा’च्या यशानंतर माधुरी दीक्षितला ‘धक-धक गर्ल’ ही ओळख मिळाली. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी तिला सुरुवातीला पहिली पसंती नव्हती.

या चित्रपटाची कथा ‘राजा’ (अनिल कपूर) आणि ‘सरस्वती’ (माधुरी दीक्षित) यांच्या आयुष्याभोवती फिरते. आईच्या इच्छेनुसार राजा लग्न करतो पण त्यानंतर त्याची पत्नी सरस्वती सासू-सून वादात अडकते. कौटुंबिक नाट्य, भावना आणि संघर्ष यांचा उत्कृष्ट संगम या चित्रपटात पाहायला मिळतो.

‘बेटा’पूर्वीही अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांची जोडी 'तेजाब' सारख्या हिट चित्रपटांमध्ये दिसली. मात्र ‘बेटा’ने त्यांच्या कारकिर्दीला एक वेगळीच उंची दिली. हा चित्रपट त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला.

या चित्रपटासाठी दिग्दर्शक इंद्र कुमार यांची पहिली पसंती श्रीदेवी होती. अनिल कपूरला देखील श्रीदेवीसोबत काम करायचं होतं. मात्र, नवीन दिग्दर्शकासोबत काम करण्यास नकार देत श्रीदेवींनी हा चित्रपट नाकारला. त्यानंतर माधुरी दीक्षितने हा चित्रपट साइन केला.