
30 जुलै रोजी मध्यरात्री एक ते तीन वाजण्याच्या दरम्यान जमीन अचानक खचली आणि डोंगरावरुन माती वाहत येऊन घरे जमिनीत गाडली गेली. अनेक जणांचा झोपेतच बळी गेला असावा अशी परिस्थिती आहे. वायनाडच्या चुरालमाला , मुंडाक्कई सारख्या परिसरात मोठे नुकसान झाले आहे.

केरळासह देशात अनेक ठिकाणी गेल्या काही वर्षांत अचानक मोठा ढगफूटीसारखा पाऊस आणि पूर येत आहे.काल मंगळवारी वायनाड जिल्ह्यात असाच पाऊस अनेक संसार उद्धवस्त करुन गेला. बचाव पथकाचे काम युद्धवेगाने सुरु असले तरी पावसाने अनेक पुल तुटल्याने मोहीमेत अडथळे येत आहेत. लष्कर, नौसेना , वायुसेना, एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाचे जवान दिवसरात्र एक मृतदेह शोधत होते. परंतू आता मोहीम आवरती घ्यावी लागणार आहे.

मुंडाक्काई येथील एका वृद्धाने आपबिती सांगितली तो म्हणाला की आम्ही सर्वस्व हरवून बसलो आहोत. आमच्या घरातील कोणीच अजून सापडलेले नाही. या जमिनीवर आम्ही चालतोय खरे परंतू कदाचित याच्या खालीच आमचे जिवलग असतील. काय माहिती ते कुशल असतील की नाही.आता तर फक्त चिखलच दिसत आहे.

ज्या डोंगरांवर चहाचे मळे फुलले होते तेथूनच मृत्यू चिखल आणि दगडांना सोबत घेत वाहत खाली घरांवर आला. आपल्या घरात आणि हॉटेलात झोपलेले असलेल्या अनेक जणांना झोपत असताना मृत्यू आपल्या कवेत घेऊन गेला...

केरळ पर्यटकांनी नेहमी भरलेले असते. या भुस्खलनात देखील अनेक पर्यटकांना देखील प्राण गमवावे लागले आहेत. वायनाड जिल्ह्यातील भूस्खलनानंतर मुंडाक्काई गाव आणि चुरालमाला गाव विरान झाले आहेत. आपल्या संसारातील राहिलेले किडुक मिडुक शोधताना काही जण दिसत आहेत.

आतापर्यंत 158 लोक ठार झाले आहेत. तर 186 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. जमीनीच्या मातीत अनेक लोक दबलेले असू शकतात. वायनाड उत्तरी केरळाचा भाग असून डोंगराळ परिसरात मोडतो. येथे मोठे जंगल आहे. तीव्र उताराचे डोंगर आणि टेकड्या आहेत. हिरव्याकंच रानातून मध्येच दुधासारखे चमकणारे धबधबेही आहेत.या सौदर्यालाच कोणाची नजर लागली की काय ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मुंडाक्काई आणि चुरालमाला ही गावे नकाशावरुनच नष्ट झाली आहेत. अनेक जागी चिखल आणि दगडांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे या गावात कधी काळी माणसे राहात होती. हे कळणारच नाही अशी दुरावस्था झाली आहे.

मुंडाक्काई गावात 500 घरे होती त्यातील केवळ 34 ते 50 घरे कशीबशी तगली आहेत. प्रचंड पावसाने मोठा नैसर्गिक संकट ओढवले आणि भुस्खलन झाले. मुंडाक्काई,चुरालमाला, अट्टामाला आणि नूलपुझा गावात सर्वाधिक फटका बसला शेकडो जण धरणीत झोपेतच गाडले गेले.

ज्या डोंगरांवर चहाचे मळे फुलले होते तेथूनच मृत्यू चिखल आणि दगडांना सोबत घेत वाहत खाली घरांवर आला. आपल्या घरात आणि हॉटेलात झोपलेले असलेल्या अनेक जणांना झोपत असताना मृत्यू आपल्या कवेत घेऊन गेला.चुरालमाला येथील धबधब्यासाठी खास ओळखला जातो. येथील सुचिप्पारा, वेलोलीपारा हे धबधबे आणि सीता तलाव आदी सौदर्यस्थळे पाहाण्यासाठी पर्यटक दरवर्षी गर्दी करीत असतात. परंतू ग्लोबल वार्मिंगमुळे कुठेही अचानक ढगफूटी सदृश्य पाऊस होत असून सर्व होत्याचे नव्हते होत आहे.

आपल्या आप्तांना शोधण्यासाठी लोक जीवाचा आटापिटा करीत आहेत. एनडीआरएफ आणि लष्कराच्या मदतीला देखील हातभार लावत आहेत. चिखलात तिघा जणांचा फोटो मिळाला आहे. त्यांच्या घरातील कोणीही सापडले नाही.घराची भिंत तोडून येथे दगड माती घरात शिरल्याचे विदारक दृश्य पाहणाऱ्या जीवाची कालवाकालव करीत आहे.