
मराठी सिनेविश्वात असे अनेक नवोदित कलाकार आहेत जे त्यांच्या अभिनयातून रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. बऱ्याचदा या कलाकारांची पहिलीच एण्ट्री अनेकांना भावते. आजही मराठी इंडस्ट्री अनेक नव्या चेहऱ्यांना मोठं होण्याची संधी देते. अशातच आता एका मराठमोळ्या नवोदित चेहऱ्याच्या एण्ट्रीवर अनेकांच्या नजरा खिळल्या आहेत.

ही अभिनेत्री आहे जान्हवी सावंत. सध्या चर्चेत असलेल्या 'आरपार' या चित्रपटातून जान्हवीने सिनेविश्वात पदार्पण केलं आहे. 'आरपार' चित्रपटात ऋता दुर्गुळे आणि ललित प्रभाकरसह चित्रपटातील इतरही कलाकारांनीही त्यांच्या अभिनयाने चित्रपटाची उंची वाढविली.

या चित्रपटात झळकलेल्या नव्या चेहऱ्याने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. ही नवी अभिनेत्री नक्की कोण?, असा प्रश्नही साऱ्यांना पडला. जान्हवीची सिनेविश्वातील एण्ट्री अनेकांना भावली आहे. या चित्रपटात तिने ललितच्या होणाऱ्या पत्नीची भूमिका साकारली आहे.

चित्रपटात एक ट्विस्ट येताच तिची भूमिका संपुष्टात येते. परंतु त्यातही तिने अभिनय आणि व्यक्तिसौंदर्याने आपली विशेष छाप सोडली आहे. 'आरपार'मुळे जान्हवीला विशेष प्रेम मिळालं आहे. नवोदित अभिनेत्री म्हणून जान्हवीचा प्रवास आता खऱ्या अर्थाने सुरू झाला आहे.

एकूणच या प्रवासाबाबत जान्हवी म्हणाली, "'आरपार'मुळे मला सिनेइंडस्ट्रीत येण्याची संधी मिळाली. याबाबत मी सर्वांची ऋणी आहे. हा माझा पहिलाच चित्रपट आहे आणि पहिल्यांदाच अभिनय करताना खूप चांगल्या सहकलाकारांबरोबर स्क्रीन शेअर करायला मिळालं हे माझं भाग्यच म्हणायला हवं."