ही अभिनेत्री 10×10 च्या खोलीत टिफिन सर्व्हिस चालवून जगतेय आयुष्य, 16 व्या वर्षी केलं सलमान खानसोबत काम
16 व्या वर्षी सलमान खानसोबत चित्रपट काम करणारी ही अभिनेत्री आज आहे आर्थिक संकटात. टिफिन सर्व्हिस चालवून करतेय आपला उदरनिर्वाह.

बॉलिवूडच्या झगमगाटामागे अनेक कलाकारांचे संघर्ष, वेदना आणि एकटेपण दडलेले असते. पडद्यावर लाखो प्रेक्षकांची मने जिंकणारे अनेक कलाकार काळाच्या ओघात इंडस्ट्रीपासून दूर जातात आणि आयुष्याशी कठीण झुंज देताना दिसतात.

अशीच एक हृदयद्रावक कहाणी आहे पूजा डडवालची. एकेकाळी सलमान खानसोबत रुपेरी पडद्यावर झळकलेली ही अभिनेत्री आज ग्लॅमरच्या दुनियेपासून दूर साधं आयुष्य जगत आहे. पूजा डडवालने 1995 साली प्रदर्शित झालेल्या 'वीरगती' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. विशेष म्हणजे, अवघ्या 16 व्या वर्षी तिला सलमान खानसोबत काम करण्याची संधी मिळाली होती.

मात्र, चित्रपटसृष्टीत स्वतःची ओळख निर्माण करण्याआधीच तिचं करिअर वेगळ्या वळणावर गेलं. मोठ्या पडद्यावर अपेक्षित यश न मिळाल्यानंतर पूजाने छोट्या पडद्याकडे मोर्चा वळवला. तिने अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं. 2001 मध्ये Zee TV वरील ‘घराना’ ही तिची शेवटची चर्चेत आलेली मालिका ठरली.

याच काळात तिची ओळख राजेंद्र सिंह यांच्याशी झाली. कठीण काळात त्यांनी पूजाला मोठा आधार दिला. दरम्यान, कामाच्या शोधात पूजा गोव्यातील एका कॅसिनोमध्ये नोकरी करू लागली. मात्र, सततची धावपळ आणि तणावामुळे तिची प्रकृती बिघडत गेली. परिस्थिती इतकी गंभीर झाली की तिची दोन्ही फुफ्फुसं निकामी होण्याच्या स्थितीत पोहोचली. तिला रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या, शरीर अशक्त झालं आणि खाणंपिणंही बंद झालं.

या सगळ्यात सर्वात मोठा धक्का म्हणजे तिच्या कुटुंबानेच तिला साथ सोडली. ज्या काळात तिला आधाराची सर्वाधिक गरज होती, त्या वेळी तिला एकटं पाडण्यात आलं. अशा वेळी राजेंद्र सिंह तिच्या मदतीला धावून आले. त्यांनी तिला मुंबईत आणून उपचार सुरू केले. तपासणीनंतर पूजाला क्षयरोग म्हणजेच टीबी झाल्याचं निदान झालं.

आज पूजा डडवाल एका छोट्याशा 10x10 च्या खोलीत राहते. उदरनिर्वाहासाठी ती टिफिन सर्व्हिस चालवते आणि घरगुती जेवण बनवून आपला खर्च भागवते. इतकी संकटं येऊनही तिने चुकीचा मार्ग स्वीकारलेला नाही. मी कधीही चुकीचा रस्ता निवडला नाही आणि पुढेही निवडणार नाही, असं ती ठामपणे सांगते.