
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल महाआघाडीच्या बाजूने लागला. अटीतटीच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांनी विजय मिळवला आहे.

मतमोजणीच्या एकूण 26 फेऱ्या पार पडल्या आहेत. यात सुरूवातीपासूनच जयश्री पाटील या आघाडीवर होत्या. शेवटच्या 26 व्या फेरीपर्यंत एकूण 18901 मतांनी जयश्री जाधव विजयी झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर कोल्हापुरात जल्लोष सुरू झाला.

सतेज पाटील यांनी ही जागा काँग्रेसच्या गोटात पुन्हा यावी यासाठी मोठी फिल्डिंग लावली होती. जयश्री जाधव यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत , फटाक्याची आतिषबाजी करत विजय साजरा केला.

आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. या जागेवर पोटनिवडणुक लागली होती. सुरूवातीला ही निवडणूक बिनविरोधी करण्याचा प्रयत्न काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्याकडून करण्यात आला. मात्र भाजपने या जागेवर जयश्री पाटील यांना भाजपकडून लढण्याची ऑफर दिली.

भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी तर थेट ईडीचाही उल्लेख या निवडणुकीत केला होता. मात्र मतदारांचा कल मान्य केलाच पाहिजे, असे म्हणत चंद्रकांत पाटील यांनी या निकालाव आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.