ऐश्वर्याइतकीच सुंदर तिची वहिनी, जिंकलाय सौंदर्यस्पर्धेचा किताब; आराध्याशीही खास नातं
ऐश्वर्या रायइतकीच सुंदर तिची वहिनी श्रीमा राय आहे. सोशल मीडियावर तिचे अनेक ग्लॅमरस फोटो पहायला मिळतात. मध्यंतरीच्या काळात ऐश्वर्या आणि श्रीमा यांच्यातील वादाची चर्चा होती. मात्र काही दिवसांपूर्वीच कौटुंबिक फोटो समोर आले आणि त्यात दोघी एकत्र दिसल्या.

बॉलिवूडची सौंदर्यवती आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिच्या सौंदर्याची चर्चा नेहमीच होत असते. मात्र, सध्या तिच्यासोबतच तिच्या कुटुंबातील आणखी एका महिलेची चर्चा रंगली आहे.
ती म्हणजे ऐश्वर्याची वहिनी अर्थात भाऊ आदित्य रायची पत्नी श्रीमा राय. नुकत्याच समोर आलेल्या राय कुटुंबाच्या फॅमिली फोटोमुळे श्रीमा चर्चेत आली आहे.
विशेष म्हणजे, श्रीमा ही दोन मुलांची आई असून तिचं सौंदर्य आणि ग्लॅमरस अंदाज पाहून नेटकरीही आश्चर्य व्यक्त करत आहेत. श्रीमा राय या ऐश्वर्या राय बच्चनचा मोठा भाऊ आदित्य रायची पत्नी आहे.
आदित्य आणि श्रीमा यांना विहान आणि शिवांश अशी दोन मुलं आहेत. श्रीमा ही केवळ एका प्रसिद्ध अभिनेत्रीच्या कुटुंबातील सदस्य म्हणून ओळखल्या जात नाहीत, तर तिने स्वतःच्या मेहनतीनेही एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
श्रीमाने सौंदर्यस्पर्धांमध्ये सहभाग घेतला असून 2009 मध्ये ‘मिसेस इंडिया ग्लोब’ हा किताब पटकावला होता. सौंदर्य आणि बुद्धिमत्तेचा सुरेख संगम असलेल्या श्रीमाला ग्लॅमर विश्वाची आवड आहे. तिने तिच्या करिअरमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांत काम केलं असून सध्या ती कंटेंट क्रिएटर म्हणून सक्रिय आहे.
श्रीमा रायचा आतापर्यंतचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो. तिने सुरुवातीला बँकेत नोकरी केली होती. मात्र, ग्लॅमर विश्वात स्वतःची ओळख निर्माण करण्याची इच्छा असल्याने तिने नोकरी सोडून या क्षेत्रात पाऊल ठेवलं.
आज श्रीमा सोशल मीडियावर फॅशन, ब्युटी आणि लाइफस्टाइलशी संबंधित व्हिडीओ शेअर करते. इन्स्टाग्रामवर तिचे दीड लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. विविध ब्रँड्ससोबतही ती काम करतात.
विशेष म्हणजे, ऐश्वर्या रायसारख्या लोकप्रिय अभिनेत्रीच्या कुटुंबातील सदस्य असूनही श्रीमाने स्वतःच्या कामातून ओळख निर्माण करण्यावर भर दिला आहे. अलीकडेच श्रीमाने मुलगा शिवांशच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
या खास सोहळ्याला ऐश्वर्या राय बच्चन आणि तिची मुलगी आराध्या बच्चन उपस्थित होती. या फोटोंमध्ये आराध्या तिच्या चुलत भावांसोबत आनंदाने वेळ घालवताना दिसली. विहान आणि शिवांश यांच्यासोबत आराध्याची चांगली बॉन्डिंग असल्याचं या फोटोंमधून दिसून आलं.
श्रीमाने शिवांशला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्याच्या आयुष्यात अधिक आनंद, मस्ती, निसर्गासोबत वेळ आणि भरपूर हसू असावं, अशी भावना व्यक्त केली होती.
ऐश्वर्या आणि श्रीमा या दोघीही सोशल मीडियावर सक्रिय असल्या, तरी त्या एकत्र असलेले फोटो फार कमी वेळा समोर येतात. त्यामुळे त्यांच्या नात्याबद्दल अनेकदा चर्चा होत असते.