
अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या रॅम्प वॉकशिवाय 'पॅरिस फॅशन वीक' पूर्ण होऊच शकत नाही. दरवर्षी 'पॅरिस फॅशन वीक'दरम्यान रॅम्प वॉकसाठी ऐश्वर्याला आवर्जून आमंत्रित केलं जातं. यंदाही ऐश्वर्याने रॅम्प वॉक करत सर्वांचं लक्ष वेधलं.

ऐश्वर्या गेल्या अनेक वर्षांपासून 'लॉरियल'ची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. याच ब्रँडसाठी तिने पॅरिस फॅशन वीकदरम्यान रॅम्प वॉक केला. यावेळी तिने लाल रंगाचा गाऊन परिधान केला होता.

रॅम्प वॉकदरम्यान फ्लाइंग किस आणि त्यानंतर नमस्ते करत तिने सर्वांची मनं जिंकली. ऐश्वर्या या रॅम्प वॉकचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. त्यावर नेटकऱ्यांकडून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

'लॉरियल या ब्रँडसाठीचा सर्वोत्तम चेहरा', अशी कमेंट एकाने केली. तर 'ऐश्वर्याचं सौंदर्य कधीच कमी होऊ शकत नाही', असं दुसऱ्याने म्हटलंय. 'ऐश्वर्यापेक्षा दुसरी कोणतीच अभिनेत्री इतकी सुंदर असू शकत नाही', अशा शब्दांत नेटकऱ्यांनी तिचं कौतुक केलंय.

'मिस वर्ल्ड' ठरलेल्या ऐश्वर्याच्या सौंदर्यावर चाहते पुन्हा एकदा फिदा झाले आहेत. लाल रंगाच्या गाऊनमधील ऐश्वर्याचा हा लूक पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.