
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी सकाळी ६ वाजताच कामाला सुरुवात केली. पुणे येथील नदी सुधार प्रकल्प योजनेचा आढावा घेण्यासाठी सकाळीच घाटावर दाखल झाले. विसर्जन घाटाजवळ सुरू असलेल्या नदी सुधार प्रकल्पाची त्यांनी पाहणी केली.

पाण्याला प्रवाहात अडथळा नको म्हणून पिंपरीतील नदीतील दगड काढण्याचे ठरले आहे. दगड काढल्यावर किती लाख क्यूसेस पाणी पास होईल, याची माहिती अजित पवार यांनी अधिकाऱ्यांकडून घेतली. मागे पूर आला होता तेव्हा किती लाख लिटर पाणी पास झाले होते, याची विचारणा अजित पवार यांनी केली.

अजित पवार यांच्याकडून खरडीतील जलशुद्धीकरण प्रकल्पाची पाहणी करण्यात आली. जलशुद्धीकरण प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी अजित पवार आले असताना नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी नागरिकांनी सूचनाही केल्या.

ऑक्सिजन पार्कमध्ये योगसाठी शेड बाकडे उपलब्ध करुन देण्याची मागणी नागरिकांनी केली. अजित पवार यांनी जागेवरच अधिकाऱ्यांना सूचना देत बाक उपलब्ध करुन देण्याचे आदेश दिले. योगाचे महत्त्व आता वाढले आहे, लवकरात लवकर नागरिकांना सुविधा द्या, असे त्यांनी सांगितले.

सकाळच्या पाहणी दौऱ्यात अजित पवार यांनी प्राजक्ताच्या फुलांचा सुगंध घेतला. त्यावेळी याचा सुगंध खूप भारी येतो, असे सांगत त्याची किंमत विचारली. अधिकाऱ्याने ३ हजार सांगताच दादा म्हणाले, एवढी महागची झाड लावणार का? नदी सुधार प्रकल्पाच्या घाटावर अजित पवार यांनी वृक्षारोपण केले.