
मुंबईत सध्या गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे. अनेक मोठमोठ्या गणपती मंडळांचे आगमन सोहळे थाटामाटात पार पडताना दिसत आहेत. त्यातच आज मुंबईच्या गिरगावातील अखिल चंदनवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतीचा आगमन सोहळा पार पडला.

अखिल चंदनवाडी गणेशोत्सव मंडळाच्या आगमन सोहळ्यासाठी हजारो भक्तांची गर्दी पाहायला मिळाली. अखिल चंदनवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची स्थापना १९७८ मध्ये झाली. यंदा या गणेशोत्सवाचे 48 वे वर्ष आहे.

अखिल चंदनवाडी गणेशोत्सव मंडळ हे त्यांची अनोखी परंपरा आणि भव्यतेमुळे प्रसिद्ध आहे. या मंडळाची मूर्ती दरवर्षी मूर्तिकार सिद्धेश नामदेव दिघोळे यांच्याकडून तयार केली जाते. या मंडळाच्या गणपतीला प्रेमाने गोड गणपती म्हणून ओळखले जाते.

पण या गणपतीला गोड गणपती हे नाव कसं पडलं, त्यामागचे कारण काय याबद्दल आज आपण जाणून घेऊया. अखिल चंदनवाडीच्या गणपती बाप्पाला गोड गणपती हे नाव पडण्यामागे एक खास प्रथा कारणीभूत आहे. ज्याची सुरुवात भक्तांच्या श्रद्धेतून सुरू झाली.

काही वर्षांपूर्वी एका भक्ताने आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी या बाप्पाकडे नवस केला होता. त्याचा तो नवस पूर्ण झाल्यावर त्याने गणपती बाप्पाला साखर अर्पण करण्याचे वचन दिले होते. त्या भक्ताचा नवस पूर्ण झाला. त्यानंतर त्याने नवस बोलल्याप्रमाणे बाप्पावर साखरेचा वर्षाव केला.

ही घटना पाहून इतर भाविकांनीही याचे अनुकरण करण्यास सुरुवात केली. यानंतर मग ही प्रथा हळूहळू लोकप्रिय झाली. याच परंपरेमुळे या गणपतीला गोड गणपती असे नाव पडले आहे. साखरेचा वर्षाव करण्याच्या प्रथेवर काही जणांनी आक्षेप घेतला होता.

पण मंडळाने यावर एक छान उपाय शोधून काढला. जे भक्त गणपती बाप्पाच्या चरणी साखर अर्पण करतात, तेव्हा ती सर्व साखर उधळली जात नाही. त्यातील थोडी साखर ही गुलालात मिक्स केली जाते. यानंतर विसर्जनावेळी बाप्पावर त्याचा वर्षाव केला जातो.

यानंतर बाप्पाच्या चरणी अर्पण केलेली साखर दुसऱ्या दिवशी नारळासोबत चंदनावाडीतील रहिवाशांना प्रसाद म्हणून वाटली जाते. यामुळे, भक्तांच्या श्रद्धेचा आदर राखला जातो आणि साखरेचा सदुपयोगही होतो. ही परंपरा प्रसिद्धीसाठी नसून, केवळ भक्तांच्या श्रद्धेचे प्रतीक आहे.