
पुणे येथील हगवणे प्रकरण ताजे असतानाच अमरावतीमध्ये पतीच्या छळाला कंटाळून तीस वर्षीय महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. आज (25 मे) सकाळी अमरावती शहरातील जय भोले कॉलनी परिसरात ही घटना घडली.

शुभांगी निलेश तायवाडे असे या आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून शुभांगीचा पती निलेश तायवाडे हा सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये सीनियर मॅनेजर पदावर कार्यरत आहे. तर शुभांगी ही आरोग्य विभागात कम्युनिटी हेल्थ ऑफिसर या पदावर कार्यरत आहे.

शुभांगी व निलेशचा विवाह चार वर्षांपूर्वी झाला. त्यांना एक तीन वर्षाची मुलगी व एका वर्षाची एक मुलगी अशी दोन आपत्यं आहेत. लग्नानंतर काही दिवसांतच निलेशने शुभांगीचा छळ करणे सुरू केले होते. या त्रासामुळेच शुभांगीने आत्महत्या केल्याचा आरोप शुभांगीचे वडील व आई या दोघांनी केला आहे.

शुभांगीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात सध्या ठेवण्यात आला असून जोपर्यंत शुभांगीचा लहान भाऊ येत नाही तोपर्यंत शवविच्छेदन करु नये अशी मागणी कुटुंबीयांनी केलेली आहे.

आपल्या मुलीने आत्महत्या केली नाही तर निलेशने तिला फासावर लटकवले असादेखील आरोप मृत शुभांगीच्या आईने केला आहे.

आता या प्रकरणाचा संपूर्ण तपास गाडगे नगर पोलीस करत आहेत. मृत शुभांगीचा पती निलेश तायवाडे व सासू यांना गाडगे नगर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलेले आहे.