
मालवण या तालुक्यातील तळाचील या गावामध्ये समुद्राचा धोका निर्माण झाला आहे. समुद्राने या भागातील किनारपट्टी गिळंकृत करायला सुरुवात केलीय. समुद्राच्या लाटांमुळे या गावातील साधारण 20 ते 30 मीटर भाग पूर्णपणे खचला आहे.

या भागात समुद्राच्या मोठ्या लाटा येतात. वेगात आलेल्या या लाटा किनाऱ्यावर जोरात आदळतात. त्यामुळेच किनारपट्टीवरील सगळे दगड उघडे पडले आहेत. त्यामुळेच आता या भागाची झिज होत आहे.

ही बाब लक्षात येताच जेसीबीच्या माध्यमातून झिज झालेल्या भागात भर टाकण्यात येत आहे. भविष्यात समुद्राच्या लाटांमुळे हा संपूर्ण भाग नष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे किनारपट्टीवर साधारण 500 ते 600 मीटपर्यंत बंधारा बांधण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे. तळाशील वाडी या गावाच्या एका बाजूला खाडी आणि एका बाजूला समुद्र आहे.

हा निमुळता पट्टा आहे. त्यामुळे या दीड किलोमीटरच्या पट्ट्यात अगोदर सागरी बंधारे झालेले आहेत. मात्र हा 500 ते 600 मीटरच्या भागावर बंधारा नाही. परिणामी हा भाग पूर्णपणे समुद्रात वाहून जाण्याची शक्यता आहे.

अशीच स्थिती राहिली तर या गावाचे थेट दोन तुकडे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. समुद्र रस्त्याच्या पाच ते दहा फुटांवर येऊन पोहोचला आहे. हा रस्ता एकदा वाहून गेला की गावाचे दोन तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही.