
नाशिकच्या 'भोंदू बाबा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वयंघोषित ज्योतिषी आणि कॅप्टन अशोक खरात याच्या प्रकरणाने राज्यभर खळबळ उडाली आहे. लैंगिक शोषण, बलात्कार आणि जादूटोण्याच्या आरोपाखाली अटक झालेल्या खरातने पोलीस कोठडीतही आपली 'भोंदूगिरी' सोडली नाही. आता त्याने नेमकं काय केलं चला जाणून घेऊया..

समोर आलेल्या माहितीनुसार, अशोक खरातच्या बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांचे त्याने अचूक भविष्य सांगून त्यांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला.

सूत्रांच्या माहितीनुसार, पोलीस कोठडीत असताना खरातने कोठडीत बंदोबस्तासाठी उभे असलेल्या कर्मचाऱ्यांकडे पाहून त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित काही घटना आणि भविष्यातील संभाव्य घडामोडी सांगितल्या.

"तुमचे भविष्य मी सांगतो, तुम्हाला काय होणार हे मला माहीत आहे" अशा प्रकारे तो बोलत होता. हे सांगून त्याने कर्मचाऱ्यांमध्ये भीती आणि आश्चर्यचकीत करण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून त्याच्याबद्दल सहानुभूती वाटेल आणि कदाचित सौम्य वागणूक मिळेल, असा त्याचा हेतू असावा, असे मानले जात आहे.

मात्र, हे 'भविष्यवाणी'चे नाटक कर्मचाऱ्यांनी सहजतेने हाताळले. नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला काय आहे हे खरातला प्रत्यक्ष दाखवून दिले.

हे प्रकरण खरातच्या संपूर्ण कारभारावर प्रकाश टाकते. वर्षानुवर्षे ज्योतिष, अंकशास्त्र आणि धार्मिक विधींच्या नावाखाली लोकांना फसवणारा हा भोंदू बाबा आता स्वतःच कायद्याच्या कचाट्यात सापडला आहे. त्याच्या अटकेनंतर ५८ हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ, मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, पिस्तूल आणि इतर पुरावे जप्त झाले असून, एसआयटीकडून तपास वेगाने सुरू आहे.