विद्यार्थ्यांनो आता संधी सोडू नका… दहावी-बारावी पूरक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
औरंगाबाद विभागीय मंडळाकडून दहावी-बारावी पूरक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्याच आलं आहे. 16 जूनपासून दहावी आणि बारावीच्या पूरकपरीक्षांना एकाचवेळी सुरुवात होणर असल्याची माहिती समोर येत आहे. तर जाणून घ्या कसं असेल पूर्ण वेळापत्रक आणि व्यवस्था...

औरंगाबाद विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जून-जुलै 2026 मध्ये होणाऱ्या दहावी आणि बारावीच्या पूरक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. विभागातील छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, जालना आणि हिंगोली या पाच जिल्ह्यांतील एकूण 25 हजार 898 विद्यार्थी या परीक्षेला सामोरे जाणार आहेत.

बारावीची पूरक परीक्षा 16 जून ते 8 जुलै दरम्यान, तर दहावीची पूरक परीक्षा 16 जून ते 30 जून या कालावधीत होणार आहे. बारावीच्या पूरक परीक्षेसाठी विभागातून एकूण 19 हजार 99 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यासाठी 40 परीक्षा केंद्रे आणि 15 परिरक्षक केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.

जिल्हानिहाय पाहिल्यास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 3 हजार 822, बीडमध्ये 3 हजार 232, परभणीत 3 हजार 669, जालन्यात 3 हजार 570 तर हिंगोलीत सर्वाधिक 4 हजार 806 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत.

दहावीच्या पूरक परीक्षेसाठी विभागातील 6 हजार 799 विद्यार्थी पात्र ठरले असून त्यांच्यासाठी 41 परीक्षा केंद्रे आणि 24 परिरक्षक केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 2 हजार 228, बीडमध्ये 1 हजार 550, परभणीत 1 हजार 43, जालन्यात 1 हजार 419 तर हिंगोली जिल्ह्यात 559 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

बारावीच्या परीक्षेत इंग्रजी, मराठी, हिंदी, उर्दू, संस्कृत, गणित, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, कृषी विज्ञान, संगणकशास्त्र आणि विविध व्यावसायिक विषयांचा समावेश आहे. तर दहावीच्या परीक्षेत भाषा विषयांसह गणित, विज्ञान आणि समाजशास्त्राच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत.

परीक्षा सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी विभागीय मंडळाने केंद्रनिहाय नियोजन पूर्ण केले असून विद्यार्थ्यांनी वेळापत्रकानुसार परीक्षेला उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.