
बॉलिवूडमध्ये एकापेक्षा एक दमदार भूमिका साकारून वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या भूमी पेडणेकरने आता स्वत:चा व्यवसाय सुरू केला आहे. बहीण समीक्षा पेडणेकरसोबत मिळून तिने 'backbaylife' नावाच्या प्रीमियम पाण्याच्या ब्रँडचं उद्घाटन केलं आहे.

काही दिवसांपूर्वीच भूमी आणि समीक्षा यांनी मिळून हा व्यवसाय सुरू केला असून नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी याबद्दलची सविस्तर माहिती दिली आहे. भूमीने सांगितलं की त्यांच्या ब्रँडचं पाणी हे हिमालयच्या पर्वतरांगांमधील असून त्यात भरपूर खनिजं असतील.

"आम्ही हिमाचल प्रदेशमध्ये स्वत:चा कारखाना सुरू केला आहे. ज्यामध्ये महिला काम करतात. कारण हीच गोष्ट आम्हाला आमच्या ब्रँडमध्ये समाविष्ट करायची होती. आमची क्षमता दररोज 45 हजार बॉक्स बनवण्याची आहे", असं भूमीने सांगितलं.

भूमीने असंही सांगितलंय की, तिच्या ब्रँडच्या पाण्याचं पॅकेजिंग हे निसर्गाला लक्षात घेऊन केलं आहे. पाण्याची बाटली प्लास्टिकची नसून कागदी पुठ्ठ्याची आहे, जी नंतर रिसायकल करता येते.

आमच्या ब्रँडचं पाणी उत्तम दर्जाचं आहे, असा दावा भूमी आणि तिच्या बहिणीने केला. त्यांच्या पाण्याची किंमत सामान्य लोकांना लक्षात घेऊन ठरवण्यात आली आहे.

750 मिली बाटलीची किंमत 200 रुपये आहे, तर 500 मिली बाटलीची किंमत 150 रुपये आहे. भूमीने सांगितलं की, याशिवाय ती इतर फ्लेवर्सचे स्पार्कलिंग वॉटरसुद्धा विकणार आहे. परंतु त्यावर अद्याप काम सुरू असून लवकरच तेसुद्धा लाँच करण्यात येईल.