5 वर्षे जुन्या कॉमेडी-ड्रामाचा ओटीटीवर धुमाकूळ; IMDb वर 8.7 रेटिंग
Trending Web Series: या सीरिजमध्ये एकूण आठ एपिसोड असून, प्रत्येक भागात विनोद आणि भावनिक प्रसंगांचा सुरेख मिलाफ पाहायला मिळतो. त्यामुळेच जुन्या प्रेक्षकांसोबत नव्या प्रेक्षकांनाही ही सीरिज आवडत आहे.

Web Series: ओटीटी विश्वात दर आठवड्याला नवनवीन चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित होत असतात. मात्र, कधी कधी एखादी जुनी वेब सीरिजही नव्या रिलीजला मागे टाकत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते. सध्या असंच काहीसं घडलं आहे भुवन बामच्या ‘ढिंढोरा’ या कॉमेडी-ड्रामा वेबसीरिजच्या बाबतीत. 2021 मध्ये युट्यूबवर प्रदर्शित झालेली ही वेब सीरिज आता नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे.
विशेष म्हणजे, या सीरिजला IMDb वर 8.7 रेटिंग मिळालं असून, तिच्या दुसऱ्या सिझनचीही प्रेक्षकांना उत्सुकता आहे. ‘ढिंढोरा’ची कथा एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाभोवती फिरते. या कुटुंबातील बबलूला अचानक मोठी लॉटरी लागते आणि त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलून जातं. लॉटरीच्या पैशांमुळे कुटुंबाला ऐषोआरामाचं आयुष्य जगण्याची स्वप्नं पडू लागतात. अचानक मिळालेल्या पैशांमुळे नातेवाईक आणि शेजाऱ्यांचं वागणंही बदलतं.
मात्र, या आनंदाला लवकरच गालबोट लागतं. एका अपघातात बबलूची स्मरणशक्ती जाते आणि संपूर्ण कुटुंबासमोर नवं संकट उभं राहतं. या गोंधळात बबलूचा मुलगा आपल्या गायक होण्याच्या स्वप्नांचा पाठपुरावा करत असतो. त्याचवेळी टिटू मामा यांसारख्या अतरंगी पात्रांमुळे कथेत विनोदाची रंगत वाढते.
या वेबसीरिजचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे भुवन बामचा अभिनय. भुवनने या सीरिजमध्ये तब्बल नऊ वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. बबलू, टिटू मामा, बंचो आणि समीर फुद्दी यांसारख्या पात्रांमधून त्याने प्रेक्षकांना खळखळून हसवलं आहे. एकाच कलाकाराने इतकी वेगवेगळी पात्रं साकारून प्रत्येक पात्राला स्वतंत्र ओळख देणं ही मोठी गोष्ट आहे.
भुवनच्या अभिनयासोबतच त्याच्या विनोदाची शैली आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील नात्यांचं चित्रण प्रेक्षकांना विशेष भावलं आहे.‘ढिंढोरा’चा पहिला सीझन 2021 मध्ये यूट्यूबवर प्रदर्शित झाला होता. त्यावेळी या सीरिजला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. आता नेटफ्लिक्सवर उपलब्ध झाल्यानंतर नव्या प्रेक्षकांनाही ही सीरिज पाहण्याची संधी मिळाली आहे.