
अंकशास्त्र हे एक प्राचीन विज्ञान आहे जे जन्मतारीख आणि नावातील अक्षरांशी संबंधित संख्यांच्या अभ्यासावर आधारित आहे. यानुसार, प्रत्येक संख्येला विशिष्ट ऊर्जा असते आणि ही उर्जा व्यक्तीचा स्वभाव, भविष्य आणि नशिबावर परिणाम करते.

अंकशास्त्रज्ञांच्या मते, तुमच्या जन्मतारखेनुसार जर काही शुभ वस्तू तुम्ही धारण केल्या तर तुमच्या जीवनातील अडथळे निश्चित दूर होतात. तसेच यशाचा मार्ग मोकळा होतो. यामुळे अनेकांना जीवनात सकारात्मक बदल अनुभवता येतात. चला तर मग तुमच्या जन्माच्या तारखेनुसार कोणत्या वस्तू तुमच्यासाठी भाग्यवान ठरू शकतात, याची आपण माहिती घेऊया.

१, १०, १९ किंवा २८ या तारखेचा जन्म असणाऱ्या व्यक्तींवर सूर्य ग्रहाचे राज्य असते. यामुळे या तारखेला जन्म झालेल्या व्यक्तींनी सोन्याची अंगठी परिधान करावी. ही अंगठी अत्यंत शुभ मानली जाते. ही अंगठी धारण केल्याने आत्मविश्वास वाढतो. तसेच जीवनातील अडथळे दूर होतात. ज्यामुळे तुम्हाला सहज यश मिळते.

२, ११, २० किंवा २९ या तारखेला जन्म झालेल्या व्यक्तींवर चंद्राचे राज्य असते. त्यामुळे त्यांच्यासाठी चांदीच्या वस्तू फारच लकी असतात. त्यामुळे या लोकांनी चांदीचा कडा, चांदीची अंगठी किंवा चांदीचे छल्ला वापरावा. यामुळे तुमचे मन शांत राहते. तुमच्या जीवनात सकारात्मकता आणि स्थिरता येते.

३, १२, २१ किंवा ३० ही जन्मतारीख असलेल्या व्यक्तींवर बृहस्पतीचे वर्चस्व असते. त्यामुळे या लोकांनी शक्यतो पिवळा रुमाल जवळ ठेवावा. हे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे तुमच्या कामात तुम्हाला यश मिळते. तसेच तुमच्या जीवनात समृद्धी व प्रगतीचा मार्ग मोकळा करतो.

४, १३ किंवा २२ ही जन्मतारीख असलेल्या व्यक्तींवर राहूचे राज्य असते. या लोकांसाठी नीलम रत्न धारण करणे अत्यंत फायदेशीर ठरते. हे रत्न तुमच्या जीवनातील अडचणी कमी करून स्थिरता आणण्यास मदत करते.

५, १४ किंवा २३ या तारखेला जन्म झालेल्या व्यक्तींवर बुध ग्रहाचे राज्य असते. ज्यांचा जन्म या तारखांना झाला आहे त्यांनी गणपतीला अर्पण केलेली हिरवी दुर्वा आपल्याजवळ ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे बुद्धी तीक्ष्ण होते. तसेच संकटे दूर होतात. त्यासोबत व्यवसायात यश मिळते.

जन्मतारीख ६, १५, किंवा २४ असलेल्या व्यक्तींवर शुक्र ग्रहाचे वर्चस्व असते. त्यामुळे या लोकांनी हिरा धारण करावा. त्यांना तो अत्यंत लाभदायक ठरु शकतो. हिरा तुमच्या जीवनात प्रेम, सौंदर्य आणि भौतिक सुखांची वाढ करतो.

७, १६, किंवा २५ ही जन्मतारीख असलेल्या लोकांवर 'केतू'चे राज्य असते. या लोकांना हातात चांदीचा कडा घालणे अत्यंत शुभ मानले जाते. हा कडा तुमच्यातील आध्यात्मिक शक्ती वाढवतो. तसेच तुम्हाला अनपेक्षित लाभही मिळवून देतो.

८, १७, किंवा २६ ही जन्मतारीख असलेल्यांवर शनी ग्रहाचे राज्य असते. या लोकांनी नीलम रत्न धारण करावे. यांच्यासाठी हे विशेषतः फायदेशीर ठरते. हे रत्न तुमच्या जीवनातील संघर्षांना कमी करून स्थिरता आणि यश मिळवण्यास मदत करते.

९, १८ किंवा २७ ही जन्म तारीख असलेल्या लोकांवर मंगळाचे वर्चस्व असते. या तारखांना जन्मलेल्या लोकांनी सोन्याच्या अंगठीमध्ये पोवळे धारण करणे शुभ मानले जाते. हे रत्न तुमच्यातील ऊर्जा, साहस आणि निर्णयक्षमता वाढवते. ज्यामुळे तुम्ही सहज ध्येय साध्य करू शकता.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)