Bobby Deol: बॉबी देओलकडे किती संपत्ती? तगडं मानधन अन् ‘गरम धरम’ ढाब्यातून रग्गड नफा
Bobby Deol: थलपती विजय यांच्या 'जन नायकन'मध्ये खलनायकाची भूमिका साकारलेला अभिनेता बॉबी देओल पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. लोकप्रियता वाढल्यानंतर आता बॉबीने त्याचं मानधनसुद्धा वाढवलं आहे.

थलपती विजय यांच्या करिअरमधील शेवटचा चित्रपट 'जन नायकन' प्रदर्शित झाल्यानंतर अभिनेता बॉबी देओल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या चित्रपटात त्याने खलनायकी भूमिका साकारून सर्वांचं लक्ष वेधलं आहे. 'अॅनिमल' या चित्रपटानंतर बॉबीच्या करिअरमधील सेकंड इनिंग जोरदार सुरू आहे. एकानंतर एक त्याला दमदार भूमिकांचे ऑफर्स मिळत आहेत.

जवळपास 66 कोटी रुपयांची संपत्ती, मुंबईतील विलेपार्ले इथं 6 कोटी रुपयांचं आलिशान घर आणि 'गरम धरम' रेस्टॉरंट चेनसारख्या कौटुंबिक व्यवसायातील भागीदारी, यांसह बॉबी देओल किती कमावतो, चित्रपटांची फी आणि महागड्या संपत्तींमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश आहे, ते जाणून घेऊयात.

'डिएनए'नं दिलेल्या रिपोर्टनुसार, बॉबी देओलची एकूण संपत्ती जवळपास 66 कोटी रुपये इतकी आहे. त्याची कमाई चित्रपट, जाहिराती आणि देओल परिवाराशी संबंधित दुसऱ्या बिझनेसमधून होते. 'न्यूज 18'ने दिलेल्या वृत्तानुसार, 'अॅनिमल'च्या यशानंतर बॉबीने त्याच्या भूमिकांसाठी चार ते पाच कोटी रुपये मानधन घेण्यास सुरुवात केली आहे.

'जन नायकन' या चित्रपटातील खलनायकी भूमिकेसाठी त्याला जवळपास पाच ते दहा कोटी रुपये मानधन मिळालं आहे. चित्रपटांमधून होणाऱ्या कमाईव्यतिरिक्त बॉबीकडे इतरही संपत्ती आहे, ज्यातून तो आलिशान जीवन जगतो. मुंबईतील विलेपार्ले इथं त्याचं आलिशान घर आहे, ज्याची किंमत जवळपास सहा कोटी रुपये इतकी आहे.

अभिनयाशिवाय बॉबी त्याच्या कुटुंबाच्या इतर बिझनेसमधूनही नफा कमावतो. त्याच्या कौटुंबिक व्यवसायात 'गरम धरम' हायवे रेस्टॉरंट चेन आणि हॉस्पिटॅलिटीशी संबंधित इतर व्यवसायांचाही समावेश आहे. मध्यंतरीच्या काळात चित्रपटांपासून दूर गेलेला बॉबी आता पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आला आहे.