
समांथा प्रभू आणि नागा चैतन्य यांच्या वेगळे होण्याची बातमी आता कुठे शांत झाली होती, की त्यातच आता धनुषनं आपल्या चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे.

साऊथचा सुपरस्टार धनुषनं घटस्फोटाच्या वृत्ताची माहिती ट्विटरवरुन देत सगळ्यांना धक्का दिला आहे. ट्विटरवर पोस्ट करत धनुषनं आपल्या पत्नीसोबत विभक्त होण्याच्या आपल्या निर्णयाचा तुम्ही सगळ्यांना आदर करावा, असंही म्हटलंय.

18 वर्षांची सोबत, मैत्री, कपल, पॅरेन्ट्स आणि एक दुसऱ्याचे शुभचिंतक म्हणून आम्ही एकमेकांसोबत संसार केला. पण आज आम्ही जिथे उभे आहोत, तिथून आमचे मार्ग आता वेगवेगळे झाले आहेत, असं धनुषनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.

धनुषच्या पत्नीचं नाव ऐश्वर्या असून ती तमिळ सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी आहे.

रिपब्लिक वर्ल्डनं दिलेल्या वृत्तानुसार या दोघांचं अरेंज मॅरेज झाल्याचा दावा करण्यात आला आहे. धनुषनं आपला प्रेमविवाह झाल्याचं वृत्त अनेक मुलाखतींमध्ये फेटाळलं होतं. धनुषच्या आईवडिलांनी त्यांचं लग्न ठरवल्याचाही दावा केला जातो.

ऐश्वर्या ही धनुषपेक्षा दोन वर्षांनी मोठी असून 2004 साली ते दोघंजण लग्नाच्या बंधनात अडकले होते.

यात्रा आणि लिंगा अशी दोन मुलं त्यांना आहेत. नुकताच समांथा आणि नागा चैतन्य यांच्यापाठोपाठ आता धनुष आणि ऐश्वर्याही विभक्त झाले आहेत. दरम्यान, काही आठवड्यांपूर्वीच आमीर आणि किरणही विभक्त झाले होते.