
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री हुमा कुरेशी आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. हुमाचा जन्म 28 जुलै 1986 रोजी दिल्ली येथे झाला होता. दिल्लीत शिक्षण पूर्ण केलेल्या हुमाला सुरुवातीपासूनच अभिनयाची आवड होती. कॉलेज संपल्यानंतरच हुमा थिएटरकडे वळली.

2008 साली हुमानं मुंबईत प्रवेश केला. यानंतर हुमानं अनेक चित्रपटांचे ऑडिशनही दिले. मात्र तिला कोणतंही यश मिळालं नाही.

जेव्हा चित्रपटसृष्टीत यश मिळालं नाही, तेव्हा हुमा कुरेशीचा हिंदुस्तान युनिलिव्हरबरोबर करार झाला, यामुळे हुमाने अनेक शूट केले आणि तिचं आयुष्य बदललं. शाहरुख खानसोबतच्या जाहिरातीमध्ये ती दिसली.

हुमा कुरेशीनं 2012 साली सर्व जाहिरातींमध्ये आपली उपस्थिती दर्शवल्यानंतर 'गँग्स ऑफ वासेपुर' चित्रपटाद्वारे आपल्या कारकीर्दीची सुरूवात केली. हुमाला एका जाहिरातीमुळे हा चित्रपट मिळाला आहे.

जेव्हा ती मोबाईल अॅड शूट करत होती तेव्हा दिग्दर्शक अनुराग कश्यपची नजर तिच्या अभिनयावर पडली होती. हा चित्रपट केल्यानंतर हुमानं तिच्या कारकिर्दीत मागे वळून पाहिलं नाही.

'गँग्स ऑफ वासेपुर' नंतर हुमा कुरेशीनं बदलापूर, जॉली एलएलबी 2 आणि काला यासह अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. इतकंच नाही तर आर्मी ऑफ द डॅड या हॉलिवूड चित्रपटामध्येही तिनं आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.

हुमा उत्तम अभिनेत्री आहे सोबतच ती बोल्ड आहे. ती नेहमी तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.