
डॉ. निलेश साबळे (Nilesh Sabale), मराठी मनोरंजन विश्वातील एक प्रसिद्ध चेहरा आहे. वैद्यकीय क्षेत्रातील पदवी ते थेट अभिनयाचा वसा असा त्याचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’चा स्पर्धक म्हणून सुरु झालेला त्याचा हा प्रवास आज ‘चला हवा येऊ द्या’ सर्वेसर्वा असण्यापर्यंत पोहोचला आहे.

महाराष्ट्रच नव्हे, तर जगभरातील लोकांना खळखळवून हसवण्याचे काम करणारा हा अभिनेता सर्वांचाच लाडका आहे. आपल्या या प्रवासाविषयी सांगताना निलेश साबळे म्हणतो की, माझा लहानपणापासूनच अभिनयाकडे कल होता. स्टेजवर काम करणं मला नेहमीच आवडायचं. शाळेत असताना देखील मी अनेक कार्यक्रमांत साहभागी व्हायचो.

मी डॉक्टर झाल्यावर माझ्या आई-वडिलांना माझा खूप अभिमान वाटला. पदवी घेतल्यानंतर वाशीच्या एमजीएम न्यू बॉम्बे या हॉस्पिटलमध्ये सहा महिने काम देखील केलं. याच दरम्यान मला महाराष्ट्राचा सुपरस्टार या कार्यक्रमाची माहिती मिळाली. मी या संदर्भात आई-वडिलांशी बोललो. मला याच क्षेत्रात करिअर करायचे होते.

यावेळी पालकांनी होकार दिला, पण त्यांनी एक अट देखील ठेवली. ते म्हणाले, तू जा पण, जर दोन वर्षात या क्षेत्रात काही करू शकला नाहीस, तर पुन्हा वैद्यकीय क्षेत्राकडे वळायचं. मात्र, ती वेळ आली नाही. मी या क्षेत्रात वेगाने यशस्वी घौडदौड करू लागलो आणि आई-वडील देखील यामुळे आनंदित होते.

वैद्यकीय क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या डॉक्टर निलेश साबळेनी ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. इथूनच त्याचा अभिनयाचा प्रवास सुरु झाला. ‘फु बाई फु’ या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा यशस्वीरित्या सांभाळली. सूत्रसंचालकाचा प्रवास पुढे लेखक, दिग्दर्शक, निर्मात्यापर्यंत पोहोचला.

तर, वैद्यकीय पदवीचा मला अभिनय क्षेत्रातही उपयोग होत असल्याचे निलेश साबळे सांगतो. याबद्दल बोलताना तो म्हणतो की, अनेकदा सेटवर काही वैद्यकीय गरज लागली तर लोक माझ्याकडे येतात. कुशल बद्रिके, भाऊ कदम अशा माझ्या सहकाऱ्यांना कित्येकदा इंजेक्शन दिली आहेत. एकंदरीत या गोष्टीचा मला उपयोग सगळीकडेच होतो.

सध्या सर्वत्र महामारीचा, कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु आहे. या सगळ्यात सगळेच डॉक्टर आपल्या जीवाची पर्वा न करता लोकांची सेवा करत आहेत. एक डॉक्टर या नात्याने मला या सगळ्या परिस्थितीचे गांभीर्य कळते. माझी पत्नी देखील डॉक्टर आहे आणि ती देखील या काळात समाजाची सेवा करत आहे. त्यामुळे या काळात लढणाऱ्या सगळ्याच डॉक्टरांचे आम्ही ऋणी आहोत, असे देखील निलेश म्हणतो.