
प्राजक्ताचे नाव काढताच समोर येतात ती मंद सुगंधाची, मन प्रफुल्लित करणारी मोहक फुले. जुलै महिन्यात ही फुले बहरून येतात आणि त्याचा सुगंध सर्वत्र दरवळू लागतो. अशाच प्राजक्तला साजेसे व्यक्तिमत्त्व म्हणजे प्राजक्ता माळी (Prajakta Mali). अभिनेत्री, नृत्यांगना, सूत्रसंचालक अशा विविध माध्यमांमधून तिने कायमच तिच्या कलाकृतीचा सुगंध सर्वत्र दरवळवला. आता प्राजक्ता एका नवीन प्रवासासाठी सज्ज झाली आहे.

आता पहिल्यांदाच प्राजक्तानं तिची कविता सोशल मीडियावर शेअर केली आहे.

‘कला : ‘कला’ ही कला असते... ती तिच्याच ‘कलानं’ घ्यायला लावते… ‘कलेकलेनं’ वाढत जाते ‘कल्लाकाराला’ घडवते...’ अशी ही कविता आहे.

ग्रंथाली प्रकाशित ‘प्राजक्तप्रभा’ काव्यसंग्रहाच्या माध्यमातून प्राजक्ता एक संवेदनशील कवयित्री म्हणून आपल्या भेटीला आली आहे.

आपल्या या नवीन प्रवासाबद्दल प्राजक्ता माळी सांगते, ”कधी कुठे छापून याव्यात अथवा सोशल मीडियावर पोस्ट कराव्यात यासाठी नाही तर मी माझ्यासाठी कविता लिहीत होते. माझा काव्यसंग्रह येईल, असे कधी स्वप्नातही वाटले नव्हते. योगायोगाने हे सर्व जुळून येत आहे. त्यामुळे हा तुमच्याप्रमाणेच मलाही हा एक सुखद धक्का आहे आणि म्हणूनच विशेष आनंदही आहे.