
बहुचर्चित ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi 3) तिसऱ्या पर्वाची मोठ्या प्रमाणात चर्चा होती. आता नुकतंच 19 सप्टेंबरला ‘बिग बॉस मराठी 3’चा ग्रँड प्रिमिअर पार पडला आहे.

यात आता युवा कीर्तनकार शिवलीला बाळासाहेब पाटीलनं एण्ट्री केली आहे. शिवलीला सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. तिचे कीर्तनाचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात.

शिवलीला वयाच्या 5 व्या वर्षापासून कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं काम करते. ग्रामीण भाषा आणि प्रमाण मराठी भाषेतून अगदी विनोदी पद्धतीनं ती कीर्तन करते.

तिची ही खास आणि हटके स्टाईल चाहत्यांच्या चांगलीच पसंतीस उतरते. तिच्या मोठा चाहता वर्ग आहे.

शिवलीलाचे वडील बाळासाहेब पाटील हे सुद्धा मोठे कीर्तनकार आहेत. वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत शिवलीलानं ग्रामीण आणि शहरी भागात स्वतःचा वेगळा चाहता वर्ग बनवला होता.

एवढंच नाही तर तिनं महाविद्यालयीन शिक्षणही घेतलं आहे. मात्र महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच तिनं आपली कीर्तनाची आवड जोपासली त्याला खंड पडू दिला नाही.

कौटुंबिक जीवनातील आगळे वेगळे प्रसंग, समाजातील काही खास गोष्टी, मधेच विनोद करत ती कीर्तन करते. त्यामुळे तिनं स्वतःची एक स्टाईल निर्माण केली आहे. ही स्टाईल प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी आहे.

महत्त्वाचं म्हणजे तिनं आतापर्यंत 10 हजारांहून अधिक कीर्तनं केली आहेत आणि सहाजिकच तिनं घरात प्रवेश करताना सुद्धा हटके निरुपन करत प्रवेश केला.

त्यामुळे आता ही युवा कीर्तनकार बिग बॉसच्या या घरात स्वत:ची वेगळी जागा कशी निर्माण करेल याकडे सर्वांचं लक्ष आहे.