
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. या मालिकेतील एका अभिनेत्याने नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. अभिनेता संजय पाटीलने अबोली गोखलेशी लग्न केलं. या लग्नसोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सोमवारी 28 मार्च रोजी संजय आणि अबोलीचा लग्नसोहळा पार पडला. संजयने इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत. 'प्रत्येक प्रेमकहाणी ही सुंदर असते, पण आमची प्रेमकहाणी ही माझी सर्वांत आवडती आहे', असं कॅप्शन देत त्याने हे फोटो पोस्ट केले आहेत.

मोजके कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत या दोघांनी लग्नगाठ बांधली. यावेळी सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील सहकलाकारांनीही लग्नाला उपस्थिती लावली. संजय आणि अबोलीच्या लग्नाचे फोटो पोस्ट करत या कलाकारांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

अभिनेत्री गिरीजा प्रभू, माधवी निमकर, कपिल होनराव आणि मालिकेतल्या इतर कलाकारांनी या लग्नाला हजेरी लावली. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या चाहत्यांनीही सोशल मीडियाद्वारे संजयला शुभेच्छा दिल्या. मालिकेत संजयच्या ऑनस्क्रीन पत्नीची (देवकी) भूमिका साकारणारी मिनाक्षी राठोड मात्र या लग्नाला उपस्थित राहू शकली नाही.

सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत संजय हा उदय शिर्केपाटीलची भूमिका साकारतोय. त्याच्या या भूमिकेला नकारात्मक छटा आहे. शिर्केपाटलांची संपूर्ण संपत्ती आपल्या नावे करण्यासाठी तो भाऊ जयदीप आणि वहिनी गौरी यांच्याविरोधात कट रचत असतो.