
कलर्स मराठीवरील मालिका ‘शुभमंगल ऑनलाईन’नं मराठी रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

मालिका अजून काही दिवस सुरू असणार मात्र याचं चित्रीकरण आता पूर्ण झालं आहे. याच निमित्त मालिकेतील शंतनू सदावर्ते अर्थात अभिनेता सुयश टिळकनं काही खास फोटो शेअर करत सुंदर पोस्ट केली आहे. ज्यात त्यानं रसिक प्रेक्षकांचेही आभार मानले आहेत.

सुयशनं लिहिलं, ‘आज हा प्रवास संपला. चित्रिकरण संपलं, मालिका तुमचा निरोप घ्यायला अजून थोडा अवकाश आहे. प्रेम आणि आशिर्वादासाठी मायबाप रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार. नवीन प्रवास सुरू होण्या आधी हे लिहावसं वाटलं (नाही नवीन प्रवास म्हणजे बिग बॅास च्या घरात मी नाहीये तर कृपया तश्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका)’

या पोस्टमध्ये सुयश नवं काही तरी घेऊन प्रेक्षकांसाठी येणार असल्याचं म्हटलं आहे. गेले अनेक दिवस तो ‘बिग बॉस मराठी’ मध्ये झळकणार अशी चर्चा होती या चर्चेला मात्र त्यानं या पोस्टच्या माध्यमातून पूर्णविराम दिला आहे.

तो पुढे लिहितो, ‘’ “शंतनू सदावर्ते.” आजपर्यंत केलेल्या पात्रांपैकी वेगळं, हळवं,गडबडलेलं, पण सावरू पहाणारं पात्र. आजच्या पिढीतला तरूण मुलगा आणि त्याची गोष्ट. मालिकेची सुरूवात वेगळ्या नोट वर झाली खरी, पण पुढे त्यात वेगवेगळी वळणे येत गेली त्या प्रमाणे शंतनुला समजून घेणं कधी सोप्पं तर कधी अवघड होत गेलं. माझ्या मुळ स्वभावाच्या अगदी विरूद्ध जाणारा शंतनू मला सापडेल का नाही ह्याची मनात खूप भिती होती. पण शंतनू बरोबर मला मज्जा आली. मी रोज वेगळ्या mindset नी शंतनू ला समजून घेत होतो. ह्या सगळ्या प्रवासात नवीन कुटुंब जमलं. सुबोध दादा मंजिरी ताई कडून प्रेमाची कौतुकाची आपुलकिची थाप वेळोवेळी आत्मविश्वास वाढवत गेली. मनिष दादा, वैभव सर, मंजिरी ताई ह्यांनी दाखवलेल्या विश्वासाला पात्र ठरण्याची मजबूत कसोटी लागली होती. दररोज वेगळं आव्हान समोर होतं. दिपा ताई तुला पण मनापासून धन्यवाद मला शंतनु म्हणून पाहीलस त्यासाठी.’

मालिका निरोप घेणार या बातमीनं चाहत्यांचा हिरमोड झाला आहे. सुयशच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पाडला आहे.