
समुद्रात अनेक चकित करणारे जीव राहतात. संपूर्ण जमीन गिळंकृत करण्याची शक्ती समुद्राच्या पाण्यात आहे. पण हाच समुद्र कधीकधी आपल्याला काही महत्त्वाचे संकेत देतो.

सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमधील हर्णे समुद्रकिनाऱ्यावर एक अजब प्रकार समोर आला आहे. ही घटना पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे या घटनेचा नेमका अर्थ काय? असेही अनेकजण विचारत आहेत.

दापोलीतील हर्णे समुद्रकिनाऱ्यावर एक डॉल्फिन मृतावस्थेत आढळला आहे. समुद्रकिनाऱ्यावर आलेल्या या डॉल्फिनचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. डॉल्फिनच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

स्थानिक मच्छिमारांनी जखमी डॉल्फिनला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, परंतु तो वाचला नाही. दरम्यान, सध्या समुद्रातील प्रदूषण खूपच वाढले आहे. तेलगळती तसेच मानवी कचऱ्यामुळे या प्रदूषणात भरच पडली आहे. त्यामुळे जलचर प्राणी दगावण्याचे प्रमाण वाढलेले आहे.

असे असतानाच हा पांढऱ्या रंगाचा डॉल्फिन रत्नागिरीच्या समुद्रकिनारी मृतावस्थेत सापडल्यामुळे वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. समुद्राकडून प्रदूषण कमी करा, असे संकेत मिळत आहेत का? असा सवाल पर्यावरणप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.