Dhamaal 4 : खजिनाच हाती लागला; ‘धमाल 4’च्या कमाईत जबरदस्त वाढ, 9 दिवसांत जमवला इतक्या कोटींचा गल्ला
अजय देवगणच्या 'धमाल 4' या चित्रपटाने शनिवारी पुन्हा एकदा बाजी पलटली आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या नवव्या दिवशी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. आतापर्यंत या चित्रपटाने किती कोटी रुपये कमावले, ते जाणून घ्या..

अजय देवगणचा मल्टीस्टारर कॉमेडी चित्रपट 'धमाल 4' 10 जुलै रोजी थिएटर्समध्ये प्रदर्शित झाला. कोणताही गाजावाजा न करता, प्रमोशनवर कोट्यवधी रुपयांचा खर्च न करता हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. तरीही बॉक्स ऑफिसवर गेल्या आठ दिवसांपासून या चित्रपटाची जबरदस्त कमाई सुरू आहे.

14 कोटी रुपयांनी बॉक्स ऑफिसवर सुरुवात करणाऱ्या या चित्रपटाने प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी 22.50 कोटी रुपये आणि तिसऱ्या दिवशी 28.50 कोटी रुपयांचा गल्ला जमवला. सॅकनिल्कने दिलेल्या वृत्तानुसार, 'धमाल 4'ने वीकेंडला धमाकेदार कमाई केली आहे. प्रदर्शनाच्या आठव्या दिवशी, म्हणजेच शुक्रवारी या चित्रपटाने 5.50 कोटी रुपयांचा व्यवसाय केला.

शनिवारी पुन्हा कमाईत वाढ झाली. सॅकनिल्कने दिलेल्या माहितीनुसार, 'धमाल 4'ने शनिवारी म्हणजेच प्रदर्शनाच्या नवव्या दिवशी भारतात दहा कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. जगभरात 151 कोटी रुपयांहून अधिक कमाई केलेल्या अजय देवगणच्या या चित्रपटान भारतात आतापर्यंत 111.50 कोटी रुपये कमावले आहेत. 'धमाल 4'ने ओव्हरसीज मार्केटमध्ये एकूण 18.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाचा बजेट 130 ते 200 कोटींच्या आसपास असल्याचं कळतंय.

'धमाल 4' हा चित्रपट 'धमाल' या फ्रँचाइजीमधला चौथा भाग आहे. 2007 मध्ये 'धमाल', 2011 मध्ये 'डबल धमाल' आणि 2019 मध्ये 'टोटल धमाल' हे चित्रपट प्रदर्शित झाले होते. आता चौथ्या भागात अजय देवगण, अर्शद वारसी, रितेश देशमुख, जावेद जाफरी, रवी किशन, संजय मिश्रा, उपेंद्र लिमये, अंजली आनंद, संजीदा शेख आणि ईशा गुप्ता यांच्या भूमिका आहेत.

'धमाल 4' या चित्रपटाला सध्या 'द ओडेसी' या हॉलिवूड चित्रपटाचा सामना करावा लागणार आहे. 17 जुलै रोजी भारतात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आतापर्यंत 17 कोटी रुपये कमावले आहेत. त्यामुळे यापुढेही या चित्रपटाकडून 'धमाल 4'ला टक्कर मिळू शकते.