
बॉलिवूड अभिनेता सलमान खान रडताना दिसला म्हणजे बहुतेकांच्या मनात सर्वप्रथम 'हम दिल दे चुके सनम' सिनेमा आणि 'तड़प तड़प के' गाण्याचा सीन येतो. ऐश्वर्या रायसोबतच्या प्रेमात तुटलेल्या सलमानचे ते भावनिक रडणे अजूनही प्रेक्षकांच्या मनात आहे. पण खरा किस्सा वेगळाच आहे.

अलीकडेच फराह खानने रणवीर अल्लाहबादियाच्या पॉडकास्टमध्ये एक मनोरंजक आणि भावनिक किस्सा सांगितला. त्यात तिने स्पष्ट केले की, सलमान खानने एका गाण्यात ग्लिसरीन किंवा कृत्रिम अश्रू वापरले नव्हते. तो खरोखरच रडला होता.

हा चित्रपट आहे 'जान-ए-मन' (२००६). सलमान खान, प्रीती झिंटा आणि अक्षय कुमार यांच्या मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. अंदाजे ३५ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या चित्रपटाने भारतात फक्त २५.१२ कोटी रुपयांची कमाई केली. मात्र चित्रपटातील गाणी खूप लोकप्रिय झाली.

फराह खानने सांगितलेल्या गाण्यात न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन ब्रिजवर सलमानचा इमोशनल सीन आहे. हे गाणे आहे 'सौ दर्द'. ब्रिजवर उभ्या असलेल्या सलमानला शॉट देताना अचानक खरोखर रडू आले. फराह म्हणाली, “तो तिथे ब्रुकलिन ब्रिजवर रडत उभा होता. आम्हाला शॉट कट करायचा नव्हता. आम्ही फक्त त्याच्याभोवती कॅमेरा फिरवत होतो. मी पहिल्यांदाच सलमानला त्याच्या वेदना अशा पद्धतीने व्यक्त करताना पाहिले. त्याच्या आयुष्यात त्या वेळी जे चालले होते, ते सगळे त्याने त्या सीनमध्ये ओतले. माझे हृदय तुटले तेव्हा.”

फराह खान पुढे म्हणाल्या की, सलमान बाहेरून कठोर वाटतो, पण आतून मऊ आहे. 'जान-ए-मन'मधील हा सीन त्याच्या करिअरमधील सर्वात रिअल आणि इमोशनल परफॉर्मन्सपैकी एक मानला जातो.

'हम दिल दे चुके सनम'मधील रडणे जरी प्रेक्षकांना खूप भावले असले तरी, 'सौ दर्द' हे गाणे हे सलमान खानचे खरे अश्रू असलेले एकमेव गाणे आहे. फराह खानच्या या खुलास्याने या गाण्याला नवी भावनिक उंची मिळाली आहे.