
आयुष्यातील सर्वांत कठीण काळातच आपल्या जवळच्या लोकांची किंमत समजते, असं म्हणतात. आनंदाच्या क्षणात तर सर्वजण सहभागी व्हायला तयार असतात, पण दु:खातही जो साथ सोडत नाही, तोच खरा आपला असतो. सध्या अभिनेत्री दीपिका कक्करला असेच काही क्षण अनुभवायला मिळत आहेत. 'ससुराल सिमर का' या मालिकेतून दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिमची जोडी हिट झाली होती. याच मालिकेत काम करताना दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. परंतु त्यावेळी दीपिका आधीच विवाहित होती.

अभिनयक्षेत्रात काम करण्यापूर्वी दीपिका केबिन क्रू म्हणून नोकरी करायची. यावेळी तिची भेट पहिला पती रौनक सॅमसनशी झाली होती. रौनकसुद्धा त्याच कंपनीत दीपिकासोबत काम करायचा. एकत्र काम करता करता रौनक आणि दीपिका यांच्यात जवळीक निर्माण झाली. परंतु रौनकचा धर्म दुसरा असल्याने दीपिकाच्या कुटुंबीयांकडून त्यांच्या लग्नाला विरोध होता. तरीसुद्धा या सर्व गोष्टी न जुमानता तिने रौनकशी लग्न केलं होतं.

लग्नानंतर काही काळातच रौनक आणि दीपिकामध्ये खटके उडू लागले. 'ससुराल सिमर का' मालिकेतील सहअभिनेता शोएब इब्राहिमसोबतच्या जवळीकमुळेही रौनक आणि दीपिकाचा घटस्फोट झाला, असंही म्हटलं जातं. लग्नाच्या चार वर्षांतच रौनक आणि दीपिका विभक्त झाले. घटस्फोटाबाबत दीपिका एका मुलाखतीत म्हणाली की, मतभेदांमुळे आम्ही वेगळे झालो. या घटस्फोटानंतर दीपिका पूर्णपणे खचली होती. तेव्हा शोएबने तिची साथ दिली.

घटस्फोटानंतर दीपिका आणि शोएब यांनी निकाह केला. मुस्लीमशी लग्न करण्यापूर्वी दीपिकाला धर्मपरिवर्तन करावं लागलं होतं. दोघांनी शोएबच्या गावी मुस्लीम पद्धतींनुसार निकाल केला. शोएबशी लग्नानंतर दीपिकाने तिच्या करिअरमधून मोठा ब्रेक घेतला. शोएब आणि कुटुंबाला प्राधान्य देण्यासाठी तिने हा निर्णय घेतल्याचं म्हटलं जातं.

शोएबशी निकाह केल्यानंतर दीपिकाने मुस्लीम धर्म पूर्णपणे स्वीकारला होता. सोशल मीडियावर ती बऱ्यापैकी सक्रिय असून त्यावर विविध पदार्थ बनवतानाचे आणि कुटुंबीयांना सांभाळतानाचे व्हिडीओ किंवा व्लॉग शेअर करायची. गेल्या वर्षी दीपिकाने मुलाला जन्म दिला. शोएब आणि दीपिका यांनी त्यांच्या मुलाचं नाव रुहान असं ठेवलं.

मुलाच्या जन्माच्या वर्षभरातच आता दीपिकाला स्टेज 2 लिव्हर कॅन्सरचं निदान झालं आहे. सोशल मीडियाद्वारे तिने याबद्दलची माहिती दिली. दीपिकावर लवकरच शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या कठीण परिस्थितीत शोएब आणि त्याचे कुटुंबीय दीपिकाच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचं पहायला मिळत आहे.