
स्वयंपाकघरातील एक्झॉस्ट फॅनवरील चिकट तेलकट घाण आणि धूळ साफ करणे हे सर्वात कठीण काम वाटते. मात्र, बाजारातील महागडे क्लिनर न वापरता घरी बनवलेल्या सोप्या क्लिनिंग सोल्यूशनचा वापर करून तुम्ही तुमचा एक्झॉस्ट फॅन काही मिनिटात पूर्वीसारखा स्वच्छ आणि चमकदार करू शकता.

एक्झॉस्ट फॅनची स्वच्छता करण्यापूर्वी काही आवश्यक तयारी करणे गरजेचे असते. सर्वप्रथम, एक्झॉस्ट फॅनचे विद्युत कनेक्शन पूर्णपणे डिस्कनेक्ट करा. पंखा भिंतीवरून काळजीपूर्वक काढा आणि त्याचे वरचे कव्हर उघडा. पंख्याचे ब्लेड्स काळजीपूर्वक बाजूला काढून घ्या आणि मुख्य भाग वेगळा करा.

यानंतर एका टबमध्ये पाणी घ्या आणि त्यात डिटर्जंट, बेकिंग सोडा आणि व्हिनेगर एकत्र करून घ्या. या पाण्यामुळे तेलकट घाण आणि ग्रीस लवकर स्वच्छ होते. पंख्याच्या बाहेर असलेल्या जाळीच्या भागावर सर्वात जास्त ग्रीस जमा होते. हा जाळीचा भाग तयार केलेल्या द्रावणात काही वेळ भिजत ठेवा. यामुळे घाण आपोआप निघेल.

त्यानंतर कापड किंवा हलक्या हाताने ब्रश घासून कव्हर स्वच्छ करा. यानंतर काढलेले ब्लेड आणि पंख्याचा मुख्य भाग (मोटरचा भाग वगळता) तयार केलेल्या डिटर्जंट, बेकिंग सोडा आणि व्हिनेगरच्या द्रावणाने पूर्णपणे स्वच्छ करा. पंख्याचे कोपरे आणि कडांवरील घाण काढण्यासाठी टूथब्रशचा वापर करा.

पंख्याची मोटर हा नाजूक आणि महत्त्वाचा भाग असल्याने, तो चुकूनही थेट पाण्यात बुडवू नका किंवा धुऊ नका. एका स्प्रे बाटलीमध्ये क्लिनिंग सोल्यूशन भरा. ते मोटरजवळील फक्त बाह्य भागांवर स्प्रे करा.

यानंतर स्क्रबर किंवा कापड वापरून मोटरचा बाह्य भाग हळूवारपणे स्वच्छ करा. फवारणीमुळे ग्रीस सैल होईल आणि मोटरचा भाग ओला न होता स्वच्छ होईल. या पद्धतीने स्वच्छता केल्यास कमी श्रमात आणि कमी वेळेत तुमचा एक्झॉस्ट फॅन पूर्वीसारखा चकचकीत स्वच्छ होईल.