
आजकाल इंटरनेट जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. आपल्यापैकी अनेकांकडे इंटरनेट पॅक शिल्लक राहतो. या शिल्लक डेटाचे काय करायचं, असा प्रश्न अनेकांना पडतो. पण आता तुम्हाला या शिल्लक डेटाचा वापर करून पैसे कमावता येणार आहेत. चकित झालात ना... पण हे खरंच शक्य आहे.

भारत सरकारच्या पंतप्रधान वाय-फाय अॅक्सेस नेटवर्क इंटरफेस (PM-WANI) ही नवी योजना सुरु केली आहे. या योजनेद्वारे तुम्हाला इंटरनेट डेटा विकून हजारो रुपये कमवता येणार आहेत.

पंतप्रधान वाणी योजना ही भारत सरकारने सुरू केलेली योजना आहे. ज्याचा मुख्य उद्देश देशभरात स्वस्त आणि सुलभ सार्वजनिक वाय-फाय सेवा उपलब्ध करून देणे असा आहे.

या योजनेअंतर्गत, कोणताही व्यक्ती किंवा दुकानदार सार्वजनिक वाय-फाय हॉटस्पॉट (सार्वजनिक डेटा ऑफिस - PDO) स्थापन करून इतरांना इंटरनेट सेवा देऊ शकतो. इंटरनेट वापरणारे ग्राहक यासाठी तुम्हाला पैसे देतील, जेणेकरुन तुम्हाला कमाईची संधी मिळेल.

या योजनेचे एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे सार्वजनिक वाय-फाय सेवा देण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या परवान्याची आवश्यकता नाही. यामुळे छोटे व्यावसायिक आणि व्यक्ती सहजपणे यात सहभागी होऊ शकतात.

ही योजना सुरू करण्यासाठी जास्त गुंतवणुकीची आवश्यकता नाही. तुमच्या दुकानातील किंवा घरातील शिल्लक वाय-फाय डेटाचा वापर करून तुम्ही ही सेवा देऊ शकता.

या इंटरनेट प्लॅनची किंमत अतिशय परवडणारी आहे. हे प्लॅन ५ रुपयांपासून ९९ रुपयांपर्यंत आहेत. यामध्ये १ दिवसासाठी १ जीबी डेटा (६ रुपये), २ दिवसांसाठी २ जीबी डेटा (९ रुपये), ३ दिवसांसाठी ५ जीबी डेटा (१८ रुपये) असे विविध पर्याय उपलब्ध आहेत. यातील प्रत्येक प्लॅनमध्ये वेगवेगळ्या व्हॅलिडिटी आणि डेटाची सुविधा आहे.

यात एक महिन्यासाठी १०० जीबी डेटाचा प्लॅन फक्त ९९ रुपयांना मिळतो. या योजनेत सहभागी होणारा कोणताही व्यक्ती आपल्या गरजेनुसार आणि ग्राहकांच्या मागणीनुसार स्वतःचे इंटरनेट प्लॅन तयार करू शकतो.

या योजनेत सामील होण्यासाठी तुमच्याकडे जिओफायबर, बीएसएनएल किंवा एअरटेलसारखे वाय-फाय कनेक्शन असणे आवश्यक आहे.

यानंतर, तुम्हाला लोकांना इंटरनेट सेवा देण्यासाठी हॉटस्पॉट उपकरणे बसवावी लागतील. तसेच, तुम्हाला कोणत्याही PM-WANI मान्यताप्राप्त PDOA (सार्वजनिक डेटा ऑफिस एग्रीगेटर) शी कनेक्ट करावे लागेल, जे तुम्हाला युझर्स लॉगिन, ओटीपी आधारित प्रवेश आणि प्लॅन सेटअपची सेवा देईल.

C-DOT ही एक सरकारी PDOA कंपनी आहे. शेवटी, तुम्हाला pmwani.gov.in या वेबसाइटवर जाऊन PDO म्हणून नोंदणी करावी लागेल. येथे तुम्हाला तुमचे नाव, मोबाईल नंबर, दुकान/ठिकाणाचा पत्ता आणि इंटरनेट कनेक्शनची माहिती द्यावी लागेल. यानंतर, PDOA द्वारे प्रदान केलेल्या लॉगिन आयडीचा वापर करून तुम्ही प्लॅन सेट करू शकता आणि कमाई सुरू करू शकता.