
सध्या घराघरात उंदरांचा त्रास हा वाढत चालला आहे. यामुळे घरातील अन्न आणि पेयांचे प्रचंड नुकसान तर होतेच, पण त्यासोबत विविध रोग पसरण्याचा धोकाही वाढतो.

उंदीर केवळ धान्यच नाही, तर कपडे, पुस्तके आणि फर्निचरचेही मोठे नुकसान करतात. त्यामुळे त्यावर उपाय करणे अत्यंत महत्त्वाचे असते.

उंदरांपासून सुटका मिळवण्यासाठी अनेकजण विषारी पदार्थांचा वापर करतात, पण काही सोप्या घरगुती उपायांनी तुम्ही उंदरांना न मारता सहजपणे घराबाहेर काढू शकता.

उंदरांना घरातून दूर ठेवण्यासाठी तुरटीचा वापर खूप प्रभावी ठरतो. उंदरांना तुरटीचा वास आणि चव आवडत नाही. त्यामुळे घराच्या कोपऱ्यात, स्वयंपाकघरात किंवा कपाटात तुरटीच्या लहान गोळ्या ठेवा. तुम्ही कोपऱ्यात तुरटीची पावडर देखील टाकू शकता.

पूजेसाठी वापरला जाणारा कापूर उंदरांना सहज दूर करू शकतो. कापूरच्या तीव्र वासाने उंदरांना गुदमरल्यासारखे वाटते. त्यामुळे घराच्या कोपऱ्यात किंवा उंदिर ज्या वाटेवर जात येत असतात, तिथे कापूरच्या गोळ्या ठेवा. यामुळे उंदीर त्या जागेपासून दूर राहतील.

कांदा आणि लसणाचा तिखट वास उंदरांना दूर ठेवण्यास मदत करतो. यासाठी कांदा आणि लसूणचा रस काढा आणि तो एका स्प्रे बाटलीत भरा. त्यात थोडे पाणी मिसळून घ्या. आता हा स्प्रे घराच्या प्रत्येक कोपऱ्यात फवारा.

कडुलिंब आणि निलगिरी तेल या दोन तेलांचा वास देखील उंदरांना घरात येण्यापासून रोखतो. कडुलिंब आणि निलगिरीचे तेल एका स्प्रे बाटलीत चांगले मिसळा. उंदरांच्या येण्या-जाण्याच्या मार्गावर ते स्प्रे करा.

उंदरांना पुदिन्याचा तिखट आणि तीव्र वास अजिबात सहन होत नाही. पुदिन्याच्या तेलात कापसाचे गोळे भिजवा. ते घराच्या कोपऱ्यात, कपाटात आणि स्वयंपाकघरात ठेवा. उंदीर तुमच्या घरात प्रवेश करू नयेत म्हणून तुम्ही हे कापसाचे गोळे त्यांच्या वाटेवर देखील ठेवू शकता.