‘इंग्लिश विंग्लिश’मधील चिडखोर लेक आठवतेय का? लग्नाच्या काही दिवस आधीच मोडला साखरपुडा; मुलाने केली फसवणूक?
'इंग्लिश विंग्लिश' या चित्रपटात श्रीदेवी यांच्या मुलीची भूमिका साकारलेली अभिनेत्री नविका कोटिया हिचा साखरपुडा मोडल्याची माहिती समोर येत आहे. जानेवारी महिन्यात तिने पुण्यातील बिझनेसमनशी साखरपुडा केला होता.

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या ‘इंग्लिश विंग्लिश’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री नविका कोटिया सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नविकाने पुण्यातील व्यावसायिक माजेन मोदी याच्यासोबत जानेवारी 2026 मध्ये साखरपुडा केला होता. दोघंही पुढील वर्षी म्हणजेच 2027 मध्ये लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा होती.
मात्र, लग्नापूर्वीच या दोघांनी आपलं नातं संपवण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त समोर आलं आहे. या बातमीमुळे मनोरंजनविश्वात चर्चांना उधाण आलं आहे. नविका कोटिया आणि माजेन मोदी यांचा साखरपुडा मोडण्यामागे दोघांमधील मतभेद हे प्रमुख कारण असल्याचं सांगितलं जात आहे. या दोघांचं लग्न ठरवण्यात कुटुंबीयांची महत्त्वाची भूमिका होती.
जानेवारीमध्ये पारंपरिक पद्धतीने त्यांचा साखरपुडा झाला होता. त्यानंतर पुढील वर्षी लग्न करण्याची तयारी सुरू होती. मात्र, कालांतराने दोघांना आपल्या स्वभावात आणि आयुष्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात फरक असल्याची जाणीव झाली. त्यामुळे त्यांनी एकत्र राहण्याऐवजी वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याचं वृत्त आहे.
विशेष म्हणजे, हा निर्णय दोघांनीही परस्पर संमतीने घेतल्याचं सांगितलं जात आहे. त्यांच्यात कोणताही कटुतेचा भाव नसून दोघांनीही आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या प्रकरणावर नविका किंवा माजेन यांच्याकडून अधिकृत सविस्तर प्रतिक्रिया समोर आलेली नाही.
नविका आणि माजेन यांच्या नात्याबाबत चर्चा सुरू होण्यामागे सोशल मीडियावरील एक महत्त्वाची बाबही कारणीभूत ठरली. नविकाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून साखरपुड्याचे फोटो हटवल्याचं वृत्त समोर आलं. त्यामुळे दोघांच्या नात्यात काहीतरी बिनसलं असल्याच्या चर्चांना अधिक हवा मिळाली.
त्यांच्या नात्याबाबत समोर आलेल्या वृत्तांनुसार, दोघांनी जुलैच्या पहिल्या आठवड्यातच वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता. या घडामोडींची माहिती आता समोर आली आहे. नाविका कोटिया ही हिंदी टेलिव्हिजन आणि चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आहे. नविकाशी साखरपुडा मोडल्यानंतर माजेन हा रितिका बडियानीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं कळतंय. रितिका हीसुद्धा एक अभिनेत्रीच आहे.
2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या श्रीदेवी यांच्या ‘इंग्लिश विंग्लिश’ या चित्रपटात तिने श्रीदेवी यांच्या मुलीची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे नाविका प्रेक्षकांच्या लक्षात राहिली. तिने बालकलाकार म्हणून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. ‘कसम से’, ‘बा बहू और बेबी’ आणि ‘बालिका वधू’ यांसारख्या मालिकांमध्ये ती दिसली होती.