
बॉलिवूडचे सुपरस्टार धर्मेंद्र यांनी वयाच्या 89व्या वर्षी, 24 नोव्हेंबर रोजी जगाचा निरोप घेतला होता. आज 8 डिसेंबरला त्यांचा 90वा वाढदिवस आहे. देओल कुटुंबीया धर्मेंद्र यांचा वाढदिवस साजरा करणार आहेत. दरम्यान, धर्मेंद्र यांची लेक ईशा देओलने वडिलांच्या निधनानंतर पहिल्यांदा एक हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली. यासोबत काही फोटोही पोस्ट केले आहेत, जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहतेही ही पोस्ट पाहून भावूक होत असून महानायकाला श्रद्धांजली वाहत आहेत.

ईशा देओलने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर वडील धर्मेंद्र यांच्यासोबत काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत ईशा देओलने जे कॅप्शन दिले आहे ते पाहून चाहते देखील भावूक झाले आहेत.

“टू माय डार्लिंग पापा... आमची टीम, सगळ्यात मजबूत नाते. ‘आम्ही’... आमचे संपूर्ण आयुष्य, संपूर्ण जग आणि त्याही पलीकडे... आम्ही नेहमी एकत्र आहोत पापा. आकाश असो की जमीन... आम्ही एक आहोत. सध्या मी तुम्हाला अतिशय प्रेमाने, काळजीने आणि मौल्यवान पद्धतीने माझ्या हृदयात स्थान दिले आहे... हे संपूर्ण आयुष्य, तुम्ही माझ्या खोलवर हृदयात आहात" असे ईशाने म्हटले आहे.

पुढे ईशा म्हणाली, "त्या जादुई मौल्यवान आठवणी... आयुष्याचे धडे, शिकवण, मार्गदर्शन, जवळीक, बिनशर्त प्रेम, आदर आणि ताकद... जी तुम्ही मला तुमची मुलगी म्हणून दिलीत... त्याची जागा कोणीही घेऊ शकत नाही किंवा त्याची बरोबरीही कोणी करू शकत नाही. मला तुमची खूप आठवण येते पापा... तुमचे ते उबदार आणि संरक्षण देणारी मिठी, जे सगळ्यात आरामदायक ब्लँकेटसारखे वाटायचे... तुमचे मऊ पण मजबूत धरलेले हात, ज्यात न बोललेले संदेश असायचे..."

आणि तुमची ती सवय.. माझे नाव घेऊन हाक मारायची, त्यानंतर कधी न संपणाऱ्या गप्पा, हसणे आणि शायरी व्हायची. तुमचा मंत्र - ‘नेहमी नम्र राहा, आनंदी राहा, निरोगी आणि मजबूत राहा’... मी वचन देते की तुमचा वारसा मी अभिमान आणि सन्मानाने पुढे नेईन. आणि तुमचे ते प्रेम मी त्या लाखो लोकांपर्यंत पोहोचवण्याचा पूर्ण प्रयत्न करेन, जे तुम्हाला माझ्याइतकेच प्रेम करतात. आय लव्ह यू पापा... तुमची लाडकी मुलगी, तुमची ईशा, तुमची बिट्टू” असे ईशा म्हणाली.

ईशा ही धर्मेंद्र आणि त्यांची दुसरी पत्नी हेमा मालिनी यांची मुलगी आहे. वडिलांच्या निधनानंतर ईशा भावूक झाली आहे. तिने वडिलांच्या वाढदिवसानिमित्त पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टवर चाहते हृदयाच्या इमोजी आणि भावूक कमेंट्स करत आहेत. अनेकजण अश्रूंना आवरू शकले नाहीत.