
गर्भधारणा हा प्रत्येक महिलेसाठी एक नाजूक काळ असतो. या काळात शारीरिक बदलांसोबत मानसिक आव्हानही देखील येतात. एखादी महिला गर्भवती राहिल्यानंतर पहिले तीन महिने कोणालाही याची कल्पना देऊ नये, असं सातत्याने म्हटलं जाते. पण यामगाचे नेमकं कारण काय याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

गर्भधारणेचे पहिले तीन महिने अत्यंत महत्त्वाचे असतात. कारण याच काळात गर्भाचा विकास सुरू होतो. त्यामुळे थोडा जरी निष्काळजीपणा केला तरी गर्भपात होण्याची शक्यता असते.

त्यामुळे अनेकदा डॉक्टर पहिल्या तीन महिन्यांपर्यंत गर्भधारणेबद्दल कोणालाही न सांगण्याचा सल्ला देतात. अनेकजण याला अंधश्रद्धा मानत असले तरी, यामागे काही ठोस वैद्यकीय कारणं आहेत.

गर्भधारणेचे पहिले १२ आठवडे फार नाजूक असतात. या काळात गर्भपाताचा धोका सर्वाधिक असतो. विशेषतः ६ ते ८ आठवड्यांदरम्यान हा धोका जास्त असतो.

या काळात गर्भाचा विकास प्राथमिक अवस्थेत असतो. त्याला अनुवांशिक किंवा आरोग्यविषयक समस्या होऊ शकतात. त्यामुळे पहिल्या तीन महिन्यांत विशेष काळजी घेणं आवश्यक असते.

अनुवांशिक दोष हे गर्भपाताचं हे सर्वात मोठं कारण आहे. गर्भात काही अनियमितता असेल तर गर्भपात होऊ शकतो. अनेकदा हे गर्भधारणेच्या पहिल्या आठवड्यात होते. कारण तेव्हा गर्भाचे महत्त्वाचे अवयव विकसित होत असतात.

गर्भधारणेदरम्यान हार्मोन्सचं योग्य संतुलन खूप महत्त्वाचं असतं. प्रोजेस्टेरॉन आणि प्रोलॅक्टिनसारखे हार्मोन्स गर्भाशयाला गर्भासाठी तयार करतात. जर याची पातळी कमी असेल तर गर्भाशय गर्भाला आधार देऊ शकत नाही. त्यामुळे गर्भपात होऊ शकतो.

गर्भधारणेदरम्यान उच्च रक्तदाब, मधुमेह किंवा इतर कोणताही आजार असल्यास त्याचा परिणाम गर्भाच्या विकासावर होऊ शकतो. यामुळे गर्भाला पुरेसं पोषण मिळत नाही, ज्यामुळे गर्भपात होण्याचा धोका वाढतो.

गर्भधारणेदरम्यान कोणताही संसर्ग गर्भासाठी धोकादायक ठरू शकतो. बॅक्टेरिया किंवा विषाणूजन्य संसर्ग झाल्यास ते गर्भाशयातील बाळाच्या विकासात अडथळा ठरु शकतात. त्यामुळे गर्भपात होण्याची शक्यता वाढू शकते.

काही लोक पहिले तीन महिने गर्भवती राहिल्याचे सांगण्याबद्दलच्या परंपरेला अंधश्रद्धा मानतात. यामागे वैज्ञानिक कारणं आहेत. गर्भपातासाठी पहिले १२ आठवडे महत्त्वाचे असतात. या काळात कोणतीही गुंतागुंत झाल्यास स्त्री मानसिकदृष्ट्या तयार नसते. त्यामुळेच डॉक्टर आणि तज्ञ गर्भधारणेच्या पहिल्या तीन महिन्यांनंतरच गुडन्यूज द्या असा सल्ला देतात.