मुंबईत 5 लोकांसोबत राहायची… कधीकाळी होती एअर होस्टेस; दीपिकाबाबत 99 टक्के लोकांना हे माहीत नसेल
एअर होस्टेसपासून टीव्हीवरील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होण्यापर्यंतचा दीपिका कक्करचा प्रवास प्रेरणादायी आहे. छोट्या पडद्यावर राज्य करणाऱ्या दीपिकाचा आज असतो वाढदिवस..

दीर्घकाळापासून स्टेज-2 लिव्हर कॅन्सरशी झुंज देणारी लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कर आज (6 ऑगस्ट) 40 वर्षांची झाली आहे. छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने राज्य करणाऱ्या दीपिकाचा प्रवास मात्र अजिबात सोपा नव्हता. मोठं नाव कमावण्यापूर्वी तिने अनेक कठीण दिवस अनुभवले. एकेकाळी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर टीव्ही इंडस्ट्रीवर अधिराज्य गाजवणाऱ्या दीपिकाची गणना छोट्या पडद्यावरील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये होत होती. मात्र, या यशामागे मोठा संघर्ष दडलेला आहे. ( Photos : Social Media)

6 ऑगस्ट 1986 रोजी पुण्यात जन्मलेल्या दीपिकाने शिक्षण पूर्ण केल्यानंतर जवळपास तीन वर्षे एअर होस्टेस म्हणून काम केलं. मात्र अभिनयाची आवड तिला स्वस्थ बसू देत नव्हती. अखेर तिने चांगली नोकरी सोडून आपल्या स्वप्नांच्या मागे धावण्याचा निर्णय घेतला. अभिनयाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी दीपिका एका सुटकेसमध्ये सामान घेऊन मुंबईत आली. सुरुवातीला ती एका साध्या पीजीमध्ये राहत होती. एका खोलीत पाच ते सहा मुलींसोबत राहण्याची वेळ तिच्यावर आली होती.

मुंबईत सुरुवातीच्या काळात प्रत्येक रुपयाची बचत करणं तिच्यासाठी गरजेचं होतं. त्यामुळे अनेकदा ती ऑटो रिक्षाने प्रवास करायची, तर खर्च वाचवण्यासाठी पायीही चालत जायची. काही काळानंतर दीपिकाची आईही मुंबईत तिच्यासोबत राहायला आली. त्यानंतर दोघींनी मिळून महिन्याला सुमारे साडेसहा हजार रुपये भाड्याने एक छोटासा 1BHK फ्लॅट घेतला.

त्या काळात आर्थिक परिस्थिती इतकी कठीण होती की घरात दोन गाद्या घेण्याइतकेही पैसे नव्हते. दीपिका आणि तिची आई एकाच गादीवर झोपायच्या. पडदे विकत घेण्यासाठी पैसे नसल्याने ती खिडक्यांवर स्वतःचे दुपट्टे लावत असे. 2010 मध्ये 'भरे तेरे नैना देवी' या मालिकेतून अभिनयात पदार्पण केल्यानंतर दीपिकाला खरी लोकप्रियता मिळाली ती 'ससुराल सिमर का'मधील 'सिमर' या भूमिकेमुळे. या मालिकेने तिला घराघरात पोहोचवलं आणि टीव्ही इंडस्ट्रीतील मोठं नाव बनवलं.

अभिनयासोबतच दीपिकाने सलमान खानच्या 'बिग बॉस 12'मध्येही सहभाग घेतला. आपल्या संयमी आणि प्रभावी खेळामुळे तिने ट्रॉफीवर नाव कोरलं आणि या शोची विजेती ठरली.

मे 2025 मध्ये दीपिकाला स्टेज-2 लिव्हर कॅन्सर असल्याचं निदान झालं. यकृतातील टेनिस बॉलएवढा ट्युमर शस्त्रक्रियेद्वारे काढण्यात आला असून सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. कठीण काळातही ती धैर्याने लढत असून तिचे चाहते तिच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.

एअर होस्टेसपासून टीव्हीवरील सर्वाधिक लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक होण्यापर्यंतचा दीपिका कक्करचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. संघर्षाला न घाबरता स्वप्नांचा पाठपुरावा केल्यास यश नक्की मिळतं, हे तिने सिद्ध करून दाखवलं.